इसिसचा म्होरक्या अबू हसन ठार, एका वर्षात दहशतवादी संघटनेला दुसरा मोठा धक्का

पुणे, १ डिसेंबर २०२२: ISIS प्रमुख अबू हसन अल-हाशिमी मारला गेलाय. दहशतवादी संघटनेनं त्याच्या मृत्यूला दुजोरा दिलाय. जारी केलेल्या निवेदनात अबू हसन शत्रूंशी लढताना मारला गेल्याचं म्हटलंय. मात्र हल्ला कोणी केला, कधी मारला गेला याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. संघटनेनं आपल्या नवीन प्रमुखाचं नावही जाहीर केल्याचं सांगण्यात येतंय.

नवीन प्रमुख कोण असेल?

एक ऑडिओ संदेश जारी करून, ISIS च्या नवीन नेत्याचं नाव अबू अल-हुसेन अल-हुसैन अल-कुराशी असं ठेवण्यात आलंय. आता नवीन प्रमुखाची घोषणा झाली असली तरी तो किती काळ जिवंत असेल याची शाश्वती नाही कारण सध्या सुरक्षा यंत्रणा इसिसच्या कारवायांवर लक्ष ठेवून आहेत. याच कारणास्तव ISIS चा जुना नेता अबू इब्राहिम अल-कुराशी देखील या वर्षाच्या सुरुवातीला अमेरिकेच्या हल्ल्यात मारला गेला होता. त्यानंतरच अबू हसन अल-हाशिमीनं या पदाची सूत्रं हाती घेतली, मात्र आता तोही एका युद्धात मारला गेल्याचं वृत्त आहे.

ISIS ला अनेक मोठे धक्के

इराक आणि सीरियामध्ये सक्रिय असलेली ही दहशतवादी संघटना गेल्या काही वर्षांत खूपच कमकुवत झालीय. प्रथम, २०१७ मध्ये इराकमध्ये आयएसआयएसचा पाडाव करण्यात आला आणि त्यानंतर दोन वर्षांनंतर सीरियामध्येही ती नष्ट झाली. पण तरीही काही प्रसंगी या संघटनेचे दहशतवादी हल्ले करत राहतात. त्याचे दहशतवादी जगातील इतर देशांमध्येही दहशत पसरवण्याचं काम करतात. २०१९ मध्ये बगदादीलाही अशाच प्रकारे मारण्यात आलं होतं. अशा स्थितीत गेल्या काही वर्षांत ISIS ला जमिनीवर अनेक धक्के दिले गेलेत. त्याची दहशत अजूनही आहे, असे दावे नक्कीच केले जातात, पण तपास यंत्रणांची प्रत्येक कृती त्याला आतून पोकळ करत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा