इस्रायल, 19 जानेवारी 2022: मंगळवार, 18 जानेवारी 2022 रोजी, इस्रायलने पृथ्वीच्या वातावरणाबाहेर एक लांब पल्ल्याचं बॅलिस्टिक क्षेपणास्त्र नष्ट केले. त्यासाठी त्यांनी नवीन शस्त्र प्रणालीची चाचणी घेतली. या प्रणालीचे नाव आहे Arrow वेपन सिस्टम.
एरो वेपन सिस्टीम हा इस्रायलच्या संरक्षण यंत्रणेचा एक भाग आहे जो शत्रूकडून हवेतच नव्हे तर अंतराळातही मारा करणारे क्षेपणास्त्र नष्ट करू शकते. म्हणजेच, जर वातावरणातून लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र येत असेल, तर ही यंत्रणा क्षेपणास्त्र सोडेल आणि पृथ्वीपासून कित्येकशे किलोमीटर उंचीवर नष्ट करेल.
इस्रायलची सुरक्षा यंत्रणा आता दहशतवादी गट, लेबनॉनचा हिजबुल्लाह, पॅलेस्टाईनचा हमास आणि इराणच्या जवळच्या देशांपासून संरक्षण करेल. इस्रायलच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितलं की, Arrow वेपन सिस्टमच्या एरो-3 इंटरसेप्टर्सने लक्ष्य ओळखलं आणि ते अंतराळात नष्ट केलं. ही चाचणी पूर्णपणे यशस्वी झालीय.
इस्रायलचे संरक्षण मंत्री बेनी गँट्झ म्हणाले की, आम्ही कधीही पहिलं पाऊल उचलत नाही, परंतु शत्रूने हल्ला केला तर आम्ही त्याला सोडणार नाही. हे नवीन तंत्रज्ञान आहे. तंत्रज्ञानाच्या बाबतीत आम्ही नेहमीच पुढं जात असतो. आम्ही आमच्या देशाच्या सुरक्षेसाठी आवश्यक ते सर्व पाऊल उचलू. या सुरक्षा यंत्रणेच्या यशस्वी चाचणीनंतर इस्रायल आता आपली रणनीती मजबूत करू शकेल.
अमेरिकेच्या क्षेपणास्त्र संरक्षण एजन्सीच्या सहकार्याने इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्रीने Arrow वेपन सिस्टम विकसित केलीय. यूएस मिसाइल डिफेन्स एजन्सीचे व्हाईस अॅडमिरल जॉन हिल यांनी सांगितलं की, या चाचणीदरम्यान आम्ही या प्रणालीच्या प्रत्येक पैलूचं परीक्षण केलं. ही सुरक्षा यंत्रणा प्रत्येक बाबतीत परिपूर्ण असल्याचं दिसून आलं. आमचा इस्रायलशी जुना संबंध आहे, जो पुढंही वाढत जाईल.
इस्रायलच्या कमी पल्ल्याच्या क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणेने गेल्या वर्षी गाझा पट्टीमध्ये 11 दिवस चाललेल्या युद्धात चांगली कामगिरी केली होती. ज्यामध्ये पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासने इस्रायलवर 4000 हून अधिक रॉकेट डागले होते, परंतु इस्रायली इंटरसेप्टर्सनी 90 टक्क्यांहून अधिक रॉकेट हवेत नष्ट केले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे