श्रीहरीकोटा, २० जुलै २०२३ : भारताचे चांद्रयान-३ हे चंद्राच्या दिशेने एकएक पाऊल पुढे टाकत आहे. भारताची अंतराळ मोहीम चांद्रयान-३ ने तिसऱ्या कक्षेतील प्रवास यशस्वी पूर्ण करुन आता चौथ्या कक्षेत यशस्वीपणे प्रवेश केलाय अशी माहिती इस्त्रोने दिली. इस्त्रोने म्हटलं आहे की, चांद्रयान मोहीम वेळेवर आपले टप्पे पूर्ण करत आहे. पुढील टप्पा हा आता मंगळवारी दुपारी २ ते ३ दरम्यान पार पाडणार आहे.
पृथ्वी आणि चंद्र यांच्यात ३ लाख ८४ हजार किमी इतके अंतर आहे. अंतराळयानाचा चंद्राकडे प्रवास सुरू होण्यापूर्वी ते पृथ्वीभोवती फिरत असल्याने त्याच्या अनेक कक्षा वाढवण्याच्या प्रक्रियेतून ते जाईल. नंतर चांद्रयान पृथ्वीच्या कक्षा वाढवण्याच्या प्रक्रियेतून त्याचा वेग वाढवेल आणि पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण पासून हळूहळू सुटका करेल.
इस्त्रोच्या माहितीनुसार, ५ ऑगस्टला यान चंद्राच्या कक्षेत पोहोचेल. एकदा यानाने चंद्राच्या गुरुत्वाकर्षण क्षेत्रात प्रवेश केल्यावर, अंतर हळूहळू कमी करण्यासाठी आणि चंद्राभोवती वर्तुळाकार कक्षेत प्रवेश करण्यासाठी, कक्षा-कमी करणाऱ्या प्रक्रियेतून जाईल. तर २३ ऑगस्टला यान चंद्रावर लँड करण्याची इस्त्रोची योजना आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर