नगर, ९ ऑगस्ट २०२३ : सध्या लाच घेण्याचे प्रमाण वाढले असून, महसूल सप्ताह सुरू असताना एक तहसीलदार लाच घेतो, ही शरमेची बाब आहे. लाच घेताना पकडलो गेलो, याची भीती वा कोणते सोयरसुतकच या अधिकारी व कर्मचाऱ्यांना वाटत नाही. तीन-चार महिन्यांत पुन्हा कामावर रुजू होतात. लाच घेतल्यानंतर त्यांना शिक्षा झालीच पाहिजे.
यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून कारवाईच्या नियमात बदल करावा लागेल, अशी गरज महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली आहे. विखे पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात शासन आपल्या दारी या कार्यक्रमांचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला होता.
यावेळी आमदार संग्राम जगताप, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महापालिकेचे आयुक्त पंकज जावळे, अप्पर जिल्हाधिकारी सुहास मापारी, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल लघें आदी उपस्थित होते.
न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर