सुशांत प्रकरणात सीबीआय’नं काय दिवे लावले ते दिसतंय: शरद पवार

पंढरपूर, २९ सप्टेंबर २०२०: सध्या सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरण राज्यात आणि देशात जोर धरत आहे. देशातील आणि राज्यातील सर्व महत्वाच्या मुद्द्यांकडं कानाडोळा करत दोन्ही सरकार या प्रकरणावर राजकारण करतायत. एकीकडं कोरोनाचं संकट आणि दुसरीकडं आर्थिक संकट देखील ओढावत चाललं आहे. अशा स्थितीत एका अभिनेत्याच्या आत्महत्येवरून देशात भरभरून चर्चा होताना दिसतेय आणि यातही दोन्ही संकटं दडली गेलीत. तपासणी यंत्रणादेखील आपलं काम करतच आहे. मात्र, यावर रोज नवीन राजकीय वक्तव्य समोर येतात. शरद पवार यांनीदेखील आता सीबीआयवर टीका केली आहे.

सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास याआधी मुंबई पोलिसांकडं होता. मुंबई पोलीस याबाबत दिरंगाई करत असल्याचा आरोप लावल्यानंतर सदर तपासणी सीबीआय’कडं वर्ग करण्यात आलीय. मात्र, तपास सीबीआय’कडं जाऊन दीड दोन महिने होत आले तरी अद्याप कोणताही ठोस निकाल समोर आलेला नाही. यावर भाष्य करताना शरद पवार म्हणाले की, सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचा तपास करण्यासाठी वेगळी तपास यंत्रणा नेमली गेली. तिनं काय दिवे लावले ते पाहिलं, अशा शब्दांत पवार यांनी सीबीआयच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. शरद पवार आज (२९ सप्टेंबर) पंढरपूर दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान त्यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध विषयांवर भाष्य केलं.

यावेळी शरद पवार यांनी रामदास आठवलेंवर देखील चांगलीच खरपूस टीका केली. शरद पवारांनी एनडीएमध्ये यावं. त्यांना सत्तेत वाटा मिळेल, अशी ऑफर रामदास आठवले यांनी दिली होती. यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, ‘आठवलेंच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा एक तरी आमदार निवडून येतो का? आठवले बोलत असतात. मार्गदर्शन करत असतात. त्यांना संसदेत आणि संसदेबाहेरही कोणी गांभीर्यानं घेत नाही,’ असा टोला शरद पवारांनी लगावला.

यावेळी त्यांनी राज्यातल्या कोरोना परिस्थितीवरदेखील भाष्य केलं. अनलॉकबाबत बोलताना शरद पवारांनी, ‘काय काय सुरु करायचे ते आरोग्य खाते ठरवेल’, असं स्पष्ट केलंय. देश पातळीवर कृषी विधेयकाविरोधात एकत्र येण्याची गरज असल्याचं मत पवारांनी यावेळी व्यक्त केलं.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा