नवी दिल्ली, दि. १५ जुलै २०२०: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त युवकांना संबोधित केले. पंतप्रधान म्हणाले की आजचा दिवस २१ व्या शतकातील तरुणांना समर्पित आहे, आज कौशल्य ही तरुणांची सर्वात मोठी शक्ती आहे. बदलत्या पद्धतींनी कौशल्य बदलले आहे, आज आपले तरुण बर्याच नवीन गोष्टींचा अवलंब करीत आहेत. पंतप्रधान मोदी म्हणाले की, जगातील आरोग्य क्षेत्रात आज अनेक प्रकारचे दरवाजे उघडत आहेत.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की देशातील छोटे-छोटे कौशल्य असलेले उद्योगधंदे किंवा व्यवसायदेखील आत्मनिर्भर भारताच्या स्वप्नाला महत्त्वपूर्ण हातभार लावणार आहे. त्यामुळेच आता श्रमिक वर्गाचे देखील मॅपिंग करण्यास सरकारने सुरुवात केली आहे जेणेकरून त्यांना सुलभता प्राप्त होईल.
संकटाच्या काळामध्ये लोक विचारत आहेत की आपण आर्थिक दृष्ट्या व औद्योगिक दृष्ट्या पुढे कसे जाणार आहोत यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की या गोष्टीवरती केवळ एकच तोडगा आहे तो म्हणजे आपल्याकडे असलेल्या कौशल्यांमध्ये वाढ करत राहणे. आता इथून पुढे देशातील जनतेला नेहमीच नवनवीन कौशल्य शिकत राहणे गरजेचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की प्रत्येक यशस्वी व्यक्तीने आपल्या कौशल्यांमध्ये सुधारणा करणे गरजेचे आहे कारण जर कौशल्यामधेच सुधारणा होत नसेल तर आयुष्य व प्रगती जवळपास थांबल्यात जमा आहे.
आपल्या संबोधनामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आपण आपल्या कौशल्यांमध्ये सातत्याने वाढ करणे गरजेचे आहे कारण हीच काळाची गरज आहे. हे सांगत असताना ते म्हणाले की मला माझ्या ओळखीतील एका व्यक्तीची आठवण होत आहे. ते फारसे शिक्षित नव्हते परंतु त्यांचे हस्ताक्षर फार सुंदर होते. बदलत्या वेळेनुसार ते आपल्या कौशल्यांमध्ये सातत्याने बदल करत गेले. त्यांच्याकडील हे कौशल्य पाहताना लोकांनी देखील त्यांच्याकडून काम करून घेण्यास सुरुवात केली. प्रत्येक व्यक्तीकडे आपली स्वतःची एक वेगळी ओळख असते. एक वेगळे कौशल्य असते जे इतरांपेक्षा वेगळे असते. हे जोपासून त्यामध्ये सातत्याने बदल करणे गरजेचे आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की जर कौशल्य शिकत राहिलो तर जगण्यामध्ये उत्साह वाढत राहतो. कोणी कोणत्याही वयोगटामधील असला तरी कौशल्य शिकू शकतो. हे सांगत असताना पंतप्रधानांनी एक किस्सा सांगितला, ” मी एका संस्थेसोबत काम करत होतो. हे काम करत असताना आम्ही एक दिवस गाडीच्या साह्याने बाहेर जात होतो. जात असताना आमची गाडी रस्त्या मध्येच बंद पडली. गाडी सुरू होत नसल्या कारणाने आम्ही तिला धक्का मारून सुरू करण्याचा प्रयत्न केला. परंतु ती गाडी चालू झाली नाही. शेवटी आम्ही वैतागून मेकॅनिकला फोन केला मेकॅनिकने तेथे येऊन गाडी दोन मिनिटामध्ये सुरू करून दिली. या कामासाठी त्याने २० रुपये मागितले. आम्ही त्याला याबाबत विचारले असता तो म्हणाला की, हे वीस रुपये मी केवळ दोन मिनिटांसाठी घेत नसून तर मागील वीस वर्ष मी जो अनुभव घेतला आहे तो अनुभव मी इथे वापरला आहे आणि त्याचेच हे पैसे मी घेत आहे.”
मोदी म्हणाले की पुस्तकातून किंवा व्हिडीओ मधून तुम्ही सायकल चालवण्याची प्रक्रिया जाणून घेऊ शकता. परंतु त्याच्या माध्यमातून तुम्ही सायकल चालवायला शिकला असा होत नाही. सायकल चालवण्यासाठी तुमच्याकडून ते कौशल्य येणे आवश्यक असते. आज भारतात देखील असेच होत आहे ज्ञान आणि कौशल्य या दोन्हींमधील फरक आपण समजून घेणे गरजेचे आहे.
पंतप्रधान मोदींच्या महत्वाकांक्षी योजनांपैकी एक स्किल इंडिया मिशनला आज पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने कौशल्य विकास मंत्रालयाच्या वतीने डिजिटल कॉन्क्लेव्हचे आयोजन करण्यात आले आहे.
देशातील तरुणांचे कौशल्य वाढविण्यासाठी आणि त्यांना सक्षम बनविण्यासाठी स्किल इंडिया हा मोदी सरकारचा एक उपक्रम आहे. या मोहिमेद्वारे तरुणांचे कौशल्य विकसित केले गेले जेणेकरुन ते अधिक रोजगारक्षम आणि उत्पादनक्षम होऊ शकेल. स्किल इंडिया मोहिमेद्वारे लोकांचे तांत्रिक कौशल्य वाढविले जात आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी