मुंबई, १३ मे २०२१: अरबी समुद्रात येत्या रविवारी चक्रीवादळ येण्याची शक्यता हवामान शास्त्र विभागाने वर्तवली आहे. येत्या शुक्रवारी अरबी समुद्राच्या नैऋत्य भागात कमी दाबाचा पट्टा तयार होईल आणि रविवारपर्यंत त्याचं रूपांतर चक्रीवादळात होईल, असा इशारा विभागानं दिला आहे.
मच्छिमारांनी १४ तारखेपर्यंत किनारपट्टीवर परत यावं आणि त्यानंतर पुढची सूचना मिळेपर्यंत समुद्रात जाऊ नये, असा इशाराही त्यांनी दिला आहे. १४ ते १६ मे दरम्यान दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या बीड, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, अहमदनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये वादळी वारे आणि विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा यलो अलर्ट हवामान विभागानं जारी केला आहे.
त्यानुसार, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्ह्याधिकाऱ्यांनी दक्षतेचे आदेश जारी केले असून मदत आणि बचाव पथकांना सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत.उद्या कोकण, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडं राहील.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे