मुंबई, २४ ऑक्टोंबर २०२२: राज्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले याची पाहणी करण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल औरंगाबाद येथे दौरा केला. त्यांनी ओल्या दुष्काळाचीही पाहणीही केली. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दर हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत करावी, अशी मागणीही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली. उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्यावरून आता सत्ताधाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर टीका केली जात आहे.
शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याबाबत प्रतिक्रिया देताना संजय शिरसाट म्हणाले, उद्धव ठाकरे आज १५ मिनिटांच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यावर आले होते, याची मी बातमी पाहिली. मला वाटतं की, सर्वसामान्य शेतकऱ्याच्या किंवा कार्यकर्त्याच्या घरी चहा प्यायला गेलं तरी २० मिनिटं लागतात. पण १५ मिनिटांत दुष्काळ पाहणी दौरा होत असेल तर यासारखं आश्चर्य नाही.
तसेच या सगळ्यात एक गोष्ट खटकली. विरोधी पक्षनेते या शहरातले आहेत. उद्धव ठाकरे यांची प्रकृती बरी नाही तर त्यांना बोलायला नको होतं. त्यांना दौऱ्यावर बोलावून बोलायला का लावलं हा माझा प्रश्न असल्याचंही संजय शिरसाट यावेळी म्हणाले. उद्धव ठाकरे आले. त्यांचे स्वागत आहे. पण, येऊन दिलासा न देता जाणं हे काही बरोबर नाही. आम्हाला दिलासा दिला असता तर येवढं रामायण घडलंच नसतं,असा टोलाही संजय शिरसाठ यांनी ठाकरे यांना लगावला आहे.
दरम्यान संजय शिरसाठ यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना किशोरी पेडणेकर म्हणाल्या, उद्धव ठाकरे यांनी २४ मिनिटांचा दौरा केला, असं म्हणायला तुम्ही काय घड्याळ लावून बसले होते का? आमचा दौरा २४ मिनिटांचा असो… वा १ तासाचा असो… आम्हाला यातून काहीही साध्य करायचं नाही. आम्ही लोकांबरोबर आहोत, हेच आम्हाला सांगायचंय, बाकी आम्हाला काहीच साध्य करायचं नाही. बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी उद्धव ठाकरेंनी औरंगाबादचा दौरा केला. आम्ही साध्य केलं… आम्ही साध्य केलं… असं तुम्ही वारंवार म्हणत आहात. पण तुम्ही कसं साध्य केलं? हे सगळं लोकांना माहीत आहे.
त्यामुळे आम्हाला काहीही साध्य करायची गरज नाही, लोकं आमच्यासोबत आहेत. वाचाळवीर तानाजी सावंतांसारखं घरापासून कार्यालय आणि कार्यालयापासून घर, असे दौरे तरी आम्ही केले नाहीत असा टोलाही किशोरी पेडणेकरांनी लगावला आहे.
राज्यात सत्तांतरातून कोणाचे खिसे किती गरम झाले हे आता महाराष्ट्रातील जनतेपासून लपून राहिलेले नाही. त्यामुळे सत्ताधाऱ्यांची आणि विरोधकांची दिवाळी जोरात झाली असली तरी जनतेचे काय हा प्रश्न कायमच आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे