पुरंदर, दि. १६ जून २०२०: नीरा येथील रयत शिक्षण संस्थेत मंजूर असलेले आयटीआय तातडीने सुरू करावे व त्याच बरोबर सिनियर कॉलेजही सुरू करावे अशी मागणी नीरेतील सामाजिक कार्यकर्ते भैय्यासाहेब खाटपे यांनी केली आहे. याबाबतचे पत्र त्यांनी रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांना दिले आहे.
नीरा हे गाव जवळपास १७ हजार लोकवस्तीचे असलेले गाव आहे. या गावाच्या आसपास वीस गावातून विद्यार्थी माध्यमिक शिक्षणासाठी नीरा येथे येतात. नीरा येथील रयत संकुलातील दोन माध्यमिक शाळा व ज्युनियर कॉलेज मध्ये जवळपास दोन हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणसाठी जवळपास सोय नसल्याने तालुक्या बाहेरील महाविद्यालयात जावे लागते. यासाठी शेकडो विद्यार्थ्यांना दररोज बसने प्रवास करावा लागतो. त्यामुळे त्यांचा वेळ व पैसा दोन्हींचा अपव्यय होतो. त्याच बरोबर अनेक जण सिनियर कॉलेज जवळ नसल्याने बारावीनंतरचे शिक्षण सोडून देतात.
त्यामुळे नीरा येथील रयत संकुलात सिनियर कॉलेज सुरू करावे. त्याच बरोबर निरेच्या जवळपास कोठेही तंत्र शिक्षणासाठी आयटीआय नाही. तालुक्यात एकच आयटीआय आहे, ते ही दिवे येथे आहे . त्यामुळे विद्यार्थ्यांना ४५ किलोमीटरचा प्रवास करावा लागत आहे. त्यातच तिथे प्रशिक्षणार्थींना कमी जागा उपलब्ध असल्याने अनेकांना तंत्र शिक्षणापासून दूर राहावे लागते. सध्या कुशल कामगारांचा तुटवडा असल्याने तरुणांना आपल्या भागातच तंत्र शिक्षण मिळाले तर या भागातून अनेक कुशल कामगार तयार होऊ शकतात व तरुणांचा रोजीरोटीचा प्रश्न मिटू शकतो जेजुरी सारखे औद्योगिक केंद्र असतानादेखील केवळ तंत्रशिक्षण नसल्याने या भागातील तरुणांना तिथे नोकऱ्या मिळत नाहीत. त्यामुळे परराज्यातील अनेक कामगार तिथे काम करताना दिसतात तेच शिक्षण जर आपल्या तरुणांना स्थानिक पातळीवर मिळाले तर त्यांना जेजुरी एमआयडीसी सारख्या भागात नोकरी मिळू शकते म्हणून निरा येथील रयत संकुलात आयटीआय सुरू करावे येथील तरुणांना तंत्रशिक्षण मिळावे अशी मागणी भैय्यासाहेब खाटपे यांनी केली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे