ITI Admission 2025 Open Start Your Career with Job-Oriented Skill Training: नोकरी मिळवण्यासाठी आवश्यक कौशल्यांच्या शोधात असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (ITI) ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची पहिली फेरी सध्या जोरात सुरू आहे. तात्काळ रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या या अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा वाढता कल पाहता, यंदाही आयटीआयमध्ये प्रवेशासाठी मोठी चुरस दिसणार आहे.
निगडीतील शासकीय आयटीआयचे प्राचार्य एस. डी. साबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुणवत्ता यादीनुसार पात्र विद्यार्थ्यांना या पाच फेऱ्यांमध्ये प्रवेश दिला जाईल. प्रवेशाची पहिली फेरी ५ ते १२ जुलै दरम्यान सुरू आहे. त्यानंतर, १८ ते २२ जुलै दुसरी, २८ जुलै ते १ ऑगस्ट तिसरी, आणि ६ ते १० ऑगस्ट चौथी फेरी पार पडेल.
विशेष म्हणजे, ज्यांनी अजून अर्ज केले नाहीत किंवा ज्यांना पहिल्या चार फेऱ्यांमध्ये प्रवेश मिळाला नाही, त्यांना १८ ते २० ऑगस्ट रोजी होणाऱ्या पाचव्या (समुपदेशन) फेरीत संधी मिळेल. या फेरीसाठी विद्यार्थ्यांना वेळेत अर्ज करून आवश्यक कागदपत्रे तयार ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तत्काळ रोजगाराची संधी;
आयटीआय अभ्यासक्रमानंतर पिंपरी-चिंचवड परिसरातील कंपन्यांमध्ये तातडीने नोकरीच्या संधी उपलब्ध होत असल्याने विद्यार्थ्यांचा याकडे कल वाढला आहे. प्राचार्य साबळे यांच्या मते, “आयटीआय विद्यार्थ्यांना व्यावसायिक आणि तांत्रिक कौशल्ये देऊन अल्पावधीत रोजगारक्षम बनवण्याचा एक प्रभावी मार्ग आहे.”
शहरातील आयटीआय प्रवेश क्षमता
- निगडी आयटीआय: ३७२ जागा
- मोरवाडी आयटीआय: ५०० जागा
- कासारवाडी आयटीआय (फक्त महिलांसाठी): ११६ जागा
या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांना सोप्या पद्धतीने अर्ज करता येणार असून, आपल्या आवडीच्या क्षेत्रात कौशल्ये आत्मसात करून आत्मनिर्भर होण्याची संधी मिळणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी; सोनाली तांबे













































