६ महिन्यांपासून या देशात राहतात जॅक मा, का घेतला चीन सोडण्याचा निर्णय?

पुणे, १ डिसेंबर २०२२: चीन सरकारच्या टीकेनंतर ई-कॉमर्स कंपनी अलीबाबा ग्रुपचे सह-संस्थापक जॅक मा टोकियोमध्ये राहतायत. तिथे त्यांनी स्वतःला खूप लो प्रोफाइलमध्ये ठेवलंय. जॅक मा यांनी पर्सनल सिक्युरिटी आणि शेफही सोबत घेतले आहेत. त्यांना ओळखणाऱ्यांचं म्हणणं आहे की, जॅक गेल्या सहा महिन्यांपासून टोकियोमध्ये राहतायत.

जॅक मा यांच्या ठावठिकाणाविषयी माहिती असलेल्या लोकांवर विश्वास ठेवला तर ते सार्वजनिक ठिकाणी क्वचितच दिसतात. जपानमधील अनेक महिन्यांच्या वास्तव्यादरम्यान, जॅक मा यांनी त्यांच्या कुटुंबासह हॉट स्प्रिंगपासून स्की रिसॉर्टपर्यंत प्रवास केलाय.

फायनान्शियल टाईम्सच्या अहवालानुसार, जॅक मा यांनी टोकियोमधील गिन्झा आणि मारुनोची या मध्यवर्ती जिल्ह्यात काही मोजके खाजगी सदस्य ठेवलेत. आपला वेळ घालवण्यासाठी मा कलर पेंटिंग करत असल्याचं सांगितलं जातंय. ऑक्टोबर २०२० मध्ये, जॅक मा चिनी सरकारवर टीका केल्यानंतर निशाण्यावर आले.

या मीटिंग नंतर जॅक मा यांची सुरू झाली खराब वेळ

जॅक मा हे जगातील सर्वात मोठी तंत्रज्ञान कंपनी अलीबाबाचे संस्थापक आहेत. २०२१ मध्ये जेव्हा त्यांच्या बेपत्ता झाल्याची बातमी जगासमोर आली तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. प्रत्येकाला जाणून घ्यायचं होतं की जॅक मा कुठं आहेत? त्यानंतर त्यांचा एक व्हिडिओ समोर आला.

वास्तविक, २४ ऑक्टोबर २०२० रोजी एक बैठक झाली, ज्यामध्ये चीनच्या अर्थव्यवस्था आणि राजकारणाशी संबंधित दिग्गजांनी भाग घेतला होता. या बैठकीत जॅक मा यांनी चिनी बँकांवर टीका केली. जॅक मा म्हणाले की, बँका निधी देण्यासाठी काही तारण ठेवण्याची मागणी करतात. त्यामुळं नवीन तंत्रज्ञानाला निधी मिळत नाही आणि नवीन प्रयोगाच्या कामावर परिणाम होतो.

वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना जेव्हा जॅक मा यांच्या वक्तव्याची माहिती मिळाली तेव्हा ते संतापले आणि त्यांनी त्यांना घटनास्थळावरून गायब होण्याचे आदेश दिले. बँकांच्या टीकेनंतर चीन सरकार आणि मा यांच्यातील संबंध बिघडले.

चीन सरकारनं बंद केला IPO

जॅक मा यांच्या विरोधात चिनी सरकार इथंच थांबलं नाही. त्यानं अँट ग्रुपचा आयपीओ थांबवला, मा यांची आणखी एक कंपनी, ज्याचा आकार ३७ अब्ज डॉलर होता. या कंपनीला २.८ अब्ज डॉलर्सचा अँटी ट्रस्ट दंड ठोठावण्यात आला. या संपूर्ण घटनेनंतर जॅक मा गायब झाले.

निव्वळ संपत्तीत घट

मात्र, २०२१ मध्ये त्यांचा एक व्हिडिओ समोर आला होता. पण या वादात जॅक मा यांची संपत्ती झपाट्याने घसरली. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, नोव्हेंबर २०२० मध्ये जॅक मा यांची एकूण संपत्ती ४.९ लाख कोटी रुपये होती. नोव्हेंबर २०२१ मध्ये ती ३.५ लाख कोटींवर आली आणि नोव्हेंबर २०२२ मध्ये हा आकडा २.४ लाख कोटी झाला.

एका टीकेमुळं सापडले संकटात

जॅक मा हे चीनच्या तंत्रज्ञान विश्वाचे पोस्टर बॉय होते. ते जगभर प्रसिद्ध होते. पण चिनी सरकारवर झालेल्या टीकेमुळं त्यांचा व्यवसाय उद्ध्वस्त झाला आणि आता त्यांना दुसऱ्या देशात आश्रय घ्यावा लागलाय. चीनच्या सरकारी यंत्रणेला विरोध करण्याची किंमत जॅक मा चुकवत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा