जगातल्या अनेक देशात आज होते वेगवेगळे सेलिब्रेशन

धर्म, जात-पात, पंथ असे कशाचेही बंधन नसलेला व सर्व जगात अत्यंत उत्साहाने, आनंदाने साजरा होणारा दिवस म्हणजे नववर्षाचा दिवस. या दिवशी जगाच्या कानाकोपऱ्यातला कितीही व्यग्र असलेला माणूस या दिवसाच्या ‘सेलिब्रेशन’मध्ये सहभागी होतोच. सर्वच देशांत प्रेक्षणीय रोषणाई व लोकांचा सळसळता उत्साह व आनंददायी चेहरे पहायला मिळतात. काही देशात तर नववर्षाचे अगदी अनोख्या पद्धतीने केले जाते.

■ व्हिएतनाम : दक्षिणपूर्व आशिया देश ग्रेगोरियन दिनदर्शिकेत आपले नवीन वर्ष साजरे करतो. त्याला टेट किंवा “टेट नुग्वेन डॅन” म्हणतात. “टेट नुग्वेन डॅन” चा शाब्दिक अर्थ “नवीन कालावधीच्या पहिल्या दिवसाची पहिली सकाळ” असा आहे.व्हिएतनामद्वारे साजरा केला जाणारा हा देशातील सर्वात महत्वाचा धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आहे.

■ डेन्मार्क : डेन्मार्कने नववर्ष साजरे करण्याची नवीन कल्पना शोधली आहे. ते नवीन वर्षाच्या आदल्या रात्री प्लेटस फोडून नवीन वर्षाचे स्वागत करतात. एकीकडे जगभरात लोक त्यांचा मित्र व परिवारासोबत एकत्र येऊन नववर्षाचे स्वागत करतात, तर डेन्मार्कमध्ये लोक घरातील नको असलेली भांडी फोडून नवीन वर्षाचे स्वागत करतात.
लोक ही भांडी स्वतः च्या घरासमोर फोडतात किंवा आपल्या मित्रांच्या घरासमोर फोडतात. तेथील लोकप्रियता घरासमोर फुटलेल्या भांड्यावरून व त्यामुळे येणाऱ्या आवाजावरून समजते.

■ चीन : येथे नववर्षाचे स्वागत हे प्रचंड जल्लोषात केले जाते. नवे वर्ष चीनमध्ये एक मोठा सण असतो. अगदी दिवाळी सणाप्रमाणे चीनमध्ये नवीन वर्षाचे स्वागत केले जाते. इकडे पारंपरिक पद्धतीने नववर्षाचे स्वागत केले जाते. या पारंपरिक पद्धतीत एक पद्धत आहे, “लाल लिफाफ्या” त एकमेकांना पैसे दिले जातात. बहुतांश वेळी मोठी माणसं लहानग्यांना काही पैसे देतात. याबरोबरच आपल्या प्रमाणे चीनमध्ये नवीन वर्षाच्या स्वागतासाठी फटाके उडवण्याची परंपरा आहे.

■रशिया : येथे दीर्घकाळ असलेल्या कम्युनिस्ट साम्राज्यात नवीन वर्ष अगदी जोमात साजरे केले जाते. लोक एकत्र येऊन नवीन वर्षात आपल्या असलेल्या इच्छा आकांक्षा एका चिट्ठीवर लिहून ती चिट्ठी जाळून टाकत तिची राख दारूच्या ग्लासमध्ये टाकतात. त्यावर बर्फ टाकून, दारू ओततात व मित्रांबरोबर त्याचा आनंद घेतात.

■जपान : जापनीज लोकांच्या नवीन वर्षाच्या स्वागताच्या वेगळ्या पद्धती आहेत, वेगळ्या परंपरा आहेत. जपानमध्ये नवीन वर्षाच्या आदल्या रात्रीला ओमीसका म्हटले जाते. या दिवशी तिथल्या बुद्ध विहारात १०८ वेळा घंटा नाद केला जातो. १०८ वेळा वाजवण्याचे कारण असे, जापनीज लोक मानतात की, माणसाला १०८ इच्छा असतात. ज्या जीवनातील अनेक व्याधींसाठी कारणीभूत ठरतात.
यामुळे हा घंटानाद ऐकल्याने मनातील सर्व वाईट विचार निघुन जातात अशी आख्यायिका आहे. टोकियो येथील झोझोजी बौद्ध मंदिर ही घंटा नाद ऐकण्याची सर्वोत्तम जागा मानली जाते.

■थायलंड : हे जगातील एक प्रसिद्ध पार्टी डेस्टिनेशन आहे. मात्र तिथे पारंपरिक पद्धतीनेदेखील नववर्षाचे वेगळ्या पद्धतीने स्वागत केले जाते. थाई लोक एकमेकांवर पाणी उडवत नवीन वर्षाचे स्वागत करतात. याला थाई भाषेत “सोंगक्रांन” म्हणतात. नवीन वर्षाच्या आदल्या रात्री तुम्हाला अनेल लोक रस्त्यावर पाण्याचा बादल्या घेऊन फिरताना दिसतात, हे सर्व लोक एकमेकांवर पाणी टाकण्याच्या प्रतीक्षेत असतात.

■पोर्तुगाल : येथे शॅंपेनची बाटली उघडून आनंद व्यक्त करतात. घरातील प्रत्येक जण १२ महिन्यांचे प्रतीक म्हणून १२ मनुके खातात. प्रत्येक मनुका खाताना त्या महिन्यातल्या नियोजनाचा विचार करतात. या दिवशी एक विशेष केक बनवतात. त्याला ‘बोलो री’ म्हणजेच ‘किंग केक’ म्हणतात. केकच्या सर्व बाजूंनी गोलाकार सुका मेवा, मनुके, फळांचे तुकडे इत्यादीची सजावट करतात. अनेक युरोपीय, आशियाई, अमेरिकन देशांत नववर्षाचे स्वागत शक्‍यतो सर्व कुटुंबीयांच्या समवेत जुन्या परंपरा सांभाळून केले जाते.

■मेक्‍सिको : येथे नववर्षाच्या रात्री घड्याळाच्या १२ च्या टोलबरोबर बारा द्राक्षे खाण्याची प्रथा आहे. मेक्‍सिकोमध्ये नववर्षाच्या दिवशी घराची सजावट लाल, पिवळा, हिरवा व पांढरा याच रंगांचा वापर करून करतात. लाल रंग प्रेमाचे व जीवनपद्धती सुधारण्याचं प्रतीक, पिवळा रंग अर्थव्यवस्था सुधारण्याचे, हिरवा रंग निसर्गाचे जतन करण्याचे व पांढरा रंग उत्तम आरोग्याचे प्रतीक मानतात.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा