जळगाव शहरातील मेहरुन स्मशानभूमीत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. वृद्ध महिलेच्या अस्थी चोरीला गेल्याची अभूतपूर्व घटना समोर आली असून, शहरात मोठी खळबळ उडाली आहे. गायत्री नगर येथील ८० वर्षीय छबाबाई काशिनाथ पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन झाल्यानंतर सोमवारी त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत्यूपूर्वी त्यांनी आपल्या कुटुंबीयांना — “अंगावरील दागिने काढू नका” — अशी शेवटची इच्छा व्यक्त केली होती. कुटुंबीयांनी ती इच्छा पूर्ण करत त्यांना सोन्याच्या दागिन्यांसह अग्नी दिला.
मात्र, सोन्याच्या लालसेपोटी काही अज्ञात चोरट्यांनी सोमवारी रात्रीच स्मशानभूमीतून पाटील आजींच्या अस्थीतील डोक्याचा, हाताचा आणि पायाचा भाग चोरून नेल्याची संतापजनक घटना घडली. या प्रकारामुळे शहरात संतापाची लाट उसळली असून, पाटील कुटुंबीयांनी “सोनं सोडा, किमान रक्षा परत द्या” अशी भावनिक मागणी केली आहे.
या घटनेमुळे महापालिकेच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पाटील कुटुंबीयांसह अनेक नागरिकांनी स्मशानभूमीत सीसीटीव्ही कॅमेरे आणि कायमस्वरूपी सुरक्षा रक्षक नेमण्याची मागणी केली आहे. जळगावचे आमदार सुरेश भोळे यांनीही महापालिकेवर ताशेरे ओढत, “मृत नागरिकांच्या अस्थ्याही सुरक्षित नाहीत, ही लाजिरवाणी बाब आहे” असे तीव्र वक्तव्य केले आहे.
या प्रकरणी अद्याप पोलिसांत गुन्हा दाखल झालेला नसला, तरी चोरट्यांचा शोध घेणं हे पोलिसांसमोर मोठं आव्हान बनलं आहे. आता महत्त्वाचा प्रश्न असा की — पाटील आजींच्या अस्थी कुटुंबीयांना परत मिळतील का, आणि भविष्यात अशा अमानवी घटनांना आळा घालण्यात प्रशासन यशस्वी होईल का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी ध्रुव पाटील












































