जळगाव शहरातील व्यावसायिकाच्या कार्यालयावर हल्ला करून दरोडा टाकत जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या प्रकरणात विनोद देशमुख यांना मंगळवारी मध्यरात्री पोलिसांनी अटक केली. विनोद देशमुख हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांचे निकटवर्तीय नेते म्हणून ओळखले जातात.
हा गुन्हा 2022 मध्ये रामानंद नगर पोलीस ठाण्यात नोंदवला गेला होता, आणि तब्बल दोन वर्षांनंतर ही अटक झाली आहे. विनोद देशमुखांना दुपारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.
या प्रकरणात व्यावसायिक फिर्यादी मनोज वाणी यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन “अजित पवार यांच्या दबावामुळे पोलिस अटक करत नाहीत” असा गंभीर आरोप केला होता. या आरोपानंतर अवघ्या काही दिवसांतच ही कारवाई झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
विनोद देशमुखांच्या अटकेमुळे जळगाव जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, आता अजित पवार या प्रकरणी काही भाष्य करतात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी ध्रुव पाटील












































