भरपाई न मिळाल्यास गिरणेत उडी घेईन! अतिवृष्टीने जळगावच्या दिव्यांग शेतकऱ्याची केळीची बाग उद्ध्वस्त

जळगाव जिल्ह्यात पुन्हा एकदा निसर्गाचा कोप झाला असून, अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या केळीबागा भुईसपाट झाल्या आहेत. देवगाव येथील दिव्यांग केळी उत्पादक संतोष पाटील यांची संपूर्ण बाग पाण्याखाली गेली आहे. पाण्यामुळे भक्कम खांब मुळासकट उखडून पडले असून, तयार घड मातीत गाडले गेले आहेत. या परिस्थितीने संतोष पाटील यांचे सर्वस्व उद्ध्वस्त झाले आहे. “शासनाकडून नुकसानभरपाई न मिळाल्यास मी गिरणा नदीत उडी घेऊन जीव देईन,” अशी वेदनादायी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

नवरात्राच्या काळात केळीला देशभरातून मोठी मागणी असते. जळगावची केळी देशांतर्गत आणि परदेशी बाजारपेठेत प्रसिद्ध आहे. मात्र, या नैसर्गिक संकटामुळे केळीच्या गुणवत्तेवर परिणाम होऊन निर्यातीवरही गदा येण्याची शक्यता आहे. दरवर्षी आस्मानी संकट शेतकऱ्यांच्या पाठीशी लागलेले असते, मात्र पंचनाम्यासाठी अद्याप अधिकारी हजेरी लावली नसल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी ध्रुव पाटील