जालना, ७ फेब्रुवारी २०२४ : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत जालना येथे दि. १३ ते १७ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सवाचे भव्य आयोजन केले जाणार आहे. या महोत्सवाचा लाभ जिल्हयातील सर्व रसिकप्रेमींनी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे. महासंस्कृती महोत्सवाच्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. बैठकीस अपर जिल्हाधिकारी रिता मेत्रेवार, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी अविनाश कांबळे यांच्यासह विविध महाविद्यालयाचे प्रतिनिधी आणि विभागप्रमुख उपस्थित होते. यावेळी बैठकीत महोत्सवाच्या नियोजनाचा जिल्हाधिकारी यांनी सविस्तर आढावा घेतला.
राज्याच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत महासंस्कृती महोत्सव प्रत्येक जिल्ह्यात आयोजित केला जात आहे. त्यानुसार जालना शहरातील जेईएस महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित या पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सवात महाराष्ट्राची संस्कृती दर्शविणारे कार्यक्रम, शिवचारित्रावर आधारीत सांस्कृतिक कार्यक्रम, लोककलेतील विविध प्रकार, विविध भागातील तसेच स्थानिक दुर्मिळ आणि लुप्त होत चाललेल्या लोककला व संस्कृती यांचे कार्यक्रम, कवी संमेलन, देशभक्ती गीतांचा कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे सचित्र दालन, बचत गटांचे उत्पादन दालन, जिल्हयातील ऐतिहासिक, संरक्षित स्मारके यांच्यावर आधारीत प्रदर्शन आयोजित केले जाणार आहे. यावेळी लुप्त होत चाललेल्या विविध क्रीडा प्रकाराचे सादरीकरणही केले जाणार आहे. दरम्यान, कार्यक्रमाच्या पूवसंध्येला म्हणजे दि. १२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता जालना शहरातील मामा चौक ते जेईएस महाविद्यालयापर्यंत विद्यार्थ्यांची भव्य रॅली निघणार आहे. या रॅलीत सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महासंस्कृती महोत्सवाचे आपल्या जिल्हयात यशस्वीपणे आयोजन करण्याची सूचना करताना डॉ. पांचाळ म्हणाले की, ‘हा अतिशय स्तुत्य उपक्रम असून पाच दिवसांत कला व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विविध जबाबदारी दिलेल्या अधिकारी व त्यांच्या टीमने सुक्ष्म नियोजन करुन सर्व कामे समन्वयाने पार पाडावीत. कार्यक्रमस्थळी सर्वांसाठी आसन व्यवस्था, पार्किंग, पिण्याचे पाणी, अग्नीशामक दल, वैद्यकीय पथक, सुरळीत वीजपुरवठा आदी सर्व व्यवस्था उपलब्ध कराव्यात. महापालिकेने प्रामुख्याने स्वच्छतेबाबत दक्षता घ्यावी. शहर वाहतूक शाखेने वाहतुकीचे उत्तम व्यवस्थापन करावे. प्रेक्षकांची कुठल्याही प्रकारे गैरसोय होणार नाही, याची सर्वांनी काळजी घ्यावी.
न्यूज अनकट प्रतिनिधी : विजय साळी