जालना जिल्ह्यातील खाजगी जिनिंग बंद

जालना, दि.२४ मे २०२० : परतूर तालुक्यातील खाजगी जिनिंग बंद असल्याने शेतकऱ्यांचा हजारो क्विंटल कापूस अद्यापही घरात पडून आहे. तालुक्यात केवळ एकच कापूस खरेदी केंद्र सुरू केल्याने कापसाची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.

आष्टीत असलेली खाजगी जिनिंग चालू व्हावी अशी मागणी होत असतांनाच कापूस विक्रीसाठी मात्र परिसरातील शेतकऱ्यांना भटकंती करावी लागत असल्याने “धरण उशाला,अन कोरड घशाला “असे म्हणण्याची वेळ येवून ठेपल्याने बंद असलेल्या जिनिंग चालू करून शेतकऱ्यांची परवड थांबवावी, अशी मागणी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांतून होत आहे.

कोरोनाच्या जिवघेण्या विषाणूने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाल्याने त्याचा सर्वाधिक फटका हा शेतकरी वर्गाला बसला आहे. वर्षभर राबराब राबून पिकवलेले कापूस पिक कवडीमोल दराने विकण्याची वेळ येवून ठेपली आहे.

त्यामुळे एरवी परराज्यात व पर जिल्ह्यात चांगल्या दरात विकल्या जाणारा कापूस आज लॉक डाऊनमुळे कवडीमोल भावात विकावा लागत असतानाच कापूस विकण्यासाठी मात्र मोठ्या प्रमाणावर परवड होत असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा