गोल पोस्ट क्रीडा राज्यस्तरीय दांडपट्टा स्पर्धेत जालन्याच्या चिमुकल्यांचे चमकदार यश

राज्यस्तरीय दांडपट्टा स्पर्धेत जालन्याच्या चिमुकल्यांचे चमकदार यश

राज्यस्तरीय दांडपट्टा स्पर्धेत जालन्याच्या चिमुकल्यांनी चमकदार यश संपादन केले आहे. ऐतिहासिक वारसा आणि राजधानी म्हणून प्रसिद्ध असलेल्या सातारा शहरात दुसरी राज्यस्तरीय दांडपट्टा स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत जालना जिल्ह्यातील गौरी केदारे, शिक्षा गोधवानी, समृद्धी जावळे, रजत गौड आणि शौर्य गौड या पाच विद्यार्थ्यांनी 10 वर्ष वयोगटातील समूह युद्ध प्रकारामध्ये उल्लेखनीय कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

दांडपट्टा फिरवताना या विद्यार्थ्यांनी युद्धकलेतील चपळता, संतुलन आणि कौशल्याचे अप्रतिम प्रदर्शन करत परीक्षकांना प्रभावित केले. त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल समूहाला सिल्वर मेडल प्रदान करण्यात आले, तर एकल दांडपट्टा प्रकारात प्रत्येक विद्यार्थ्याला गोल्ड मेडल मिळाले. चिमुकल्यांच्या या यशामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून, जालना जिल्ह्याचा गौरव राज्यस्तरावर अधिक उजळला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: विजय साळी

error: Content is protected !!
Exit mobile version