जालना, ३० ऑगस्ट २०२२: श्री समर्थ रामदास स्वामी पुजा करीत असलेल्या श्रीराम, सीता, लक्ष्मण आणि हनुमानाच्या पंचधातुच्या मूर्ति चोरट्यांनी चोरी केल्याच्या घटनेला आठवडा उलटून गेला आहे. मात्र या प्रकरणी चोरट्यांचा अजूनही काही सुगावा लागलेला नाही. चोरीच्या तपासासंदर्भात आता थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोबाइलद्वारे संवाद साधत स्वामी भक्तांना आश्वासन दिलं आहे.
शिवसेना उपनेते अर्जून खोतकर यांनी या प्रकरणी मध्यस्थी करत फोन करुन थेट मुख्यमंत्र्यांसोबत भक्तांचं बोलणं करुन दिलं आहे. मूर्ति चोरीच्या घटनेला आठ दिवस उलटून देखील तपासात काहीच हाती लागलेलं नाही. त्यामुळे स्वामी भक्तांमध्ये संताप पाहायला मिळत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक आमदार राजेश टोपे यांनी विधान परीषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह जांब समर्थ गावातील त्या मंदिराला भेट दिली होती. दरम्यान काल शिवसेनेचे उपनेते अर्जून खोतकर यांनी देखील जांब गावाची व मंदिरांची पाहणी केली.
त्यावेळी त्यांनी आपल्या मोबाइल वरुन थेट मुख्यमंत्री शिंदेना फोन लावून गावकऱ्यांचा संवाद साधून दिला. मुख्यमंत्री यांनी लवकरात लवकर या चोरीचा छडा लावून मूर्ति पुन्हा हस्तगत करु आणि दोषींना कठोर शिक्षा करु, असं आश्वासन दिलं आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर