नवी दिल्ली, ६ जुलै २०२३: जम्मू काश्मीरमध्ये लवकर निवडणुका घेण्याच्या विनंती याचिकांवरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने पुढे ढकलली आहे. कलम ३७० संदर्भातील याचिकांवर येत्या ११ तारखेला सुनावणी होणार आहे. ही सुनावणी पार पडल्यानंतर निवडणूका घेण्यासंदर्भातील याचिकांवर म्हणणे ऐकून घेतले जाईल, असेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
जम्मू काश्मीरमध्ये लवकर निवडणुका घेतल्या जाव्यात, असे सांगत नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांच्यासह १३ अन्य पक्षांच्या नेत्यांनी गत मार्च महिन्यात निवडणूक आयोगाला निवेदन दिले होते. दुसरीकडे निवडणूका लवकर घेण्याबाबच्या अनेक याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत.
केंद्र सरकारने २०१९ साली जम्मू काश्मीरला प्राप्त असलेले कलम ३७० संपुष्टात आणले होते. त्याला आक्षेप घेत न्यायालयात असंख्य याचिका दाखल आहेत. या याचिकांवर सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखाली पाच न्यायमूर्तीचे खंडपीठ ११ तारखेला सुनावणी घेणार आहे. या सुनावणीनंतर निवडणूकाबाबतच्या याचिकेवर म्हणणे ऐकून घेतले जाईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर