जम्मू काश्मीर, १७ जानेवारी २०२३: जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराच्या गस्ती पथकावर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याची माहिती मिळत आहे. हा हल्ला बडगाम जिल्ह्यातील न्यायालयाजवळ करण्यात आला. त्यानंतर सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली आहे. या चकमकीत भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना ठार केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी ९.५० च्या सुमारास हा हल्ला झाला आहे. ६२ राष्ट्रीय रायफल्सची सैन्य दल या भागात गस्त घालत असताना दहशतवाद्यांनी गोळीबार केला. तर पोलीस अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्कर आणि पोलिसांच्या संयुक्त क्षेत्र नियंत्रण दलाने एक विशेष इनपुट बॅरिकेड केले होते. यावेळी संशयास्पद वाहन रोखण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दहशतवाद्यांनी गोळीबार करण्यास सुरवात केली असता, लष्करानेही प्रत्युत्तर दिले. यामध्ये दोन दहशतवादी ठार झाले आहेत. या कारवाईत सैन्याने शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त केला आहे. अरबाज मीर आणि पुलवामा येथील शाहिद शेख अशी ठार झालेल्या दोन्ही दहशतवाद्यांची नावे आहेत.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड










































