जम्मू-काश्मीर, १६ जानेवारी २०२३: जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात रविवारी सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांच्या एका तळाचा पर्दाफाश केला. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रे, काडतुसे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती देताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, पोलीस आणि लष्कराच्या संयुक्त मोहिमेदरम्यान, सुरनकोट तहसीलमधील बहियानवाली गावात दहशतवादी लपून बसले होते. त्यांच्याकडून तीन एके ४७ रायफल, १० ग्रेनेड, २८ गोळ्या, मॅगझिन, एक ग्रेनेड लाँचर आणि काही काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. मोहिमेदरम्यान कोणालाही अटक करण्यात आली नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, राजौरी हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी शोधमोहीम तीव्र केली आहे. दहशतवाद्यांचे अड्डे सातत्याने उद्ध्वस्त केले जात आहेत. भूतकाळात, सुरक्षा दलांनी डोडा जिल्ह्यातील थाथरी आणि त्याच्या आसपासच्या भागात, किश्तवाड, रामबन आणि रियासी जिल्ह्यांचे वेगवेगळे भाग, पुंछ जिल्ह्यातील मोठ्या भागाशिवाय शोध मोहीम राबवली होती. १ आणि २ जानेवारी रोजी राजौरीतील डांगरी गावात दहशतवाद्यांनी केलेल्या दोन हल्ल्यांमध्ये एका विशिष्ट समुदायाचे ७ लोक ठार आणि १४ जण जखमी झाले होते.
राजौरी जिल्ह्यातील डांगरी गावात नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्यांना या भीषण हल्ल्याची मोठी किंमत चुकवावी लागेल, असे जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी रविवारी सांगितले. ‘आवाम की आवाज’ या मासिक रेडिओ कार्यक्रमात केंद्रशासित प्रदेशातील जनतेला संबोधित करताना लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा म्हणाले की, दहशतवादाविरुद्धच्या लढाईत संपूर्ण देश एकजूट आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड