जम्मू-काश्मीर, २५ जानेवारी २०२३ : रामबन जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पावसानंतर झालेल्या दगडफेकीमुळे बुधवारी सकाळी जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला. या अपघातात ट्रकचालक ठार झाला असून, दोघे जखमी झाले आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची भारत जोडो यात्रा आज रामबन जिल्हा मुख्यालयातून बनिहालला पोचणार होती; मात्र ती रद्द करण्यात आली आहे. रामबन आणि बनिहालदरम्यान काही ठिकाणी भूस्खलन झाल्यामुळे काश्मीरला देशाच्या इतर भागाशी जोडणाऱ्या एकमेव महामार्गावरील वाहतूक विस्कळित झाली, असे वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले.
अतिवृष्टीमुळे मेहर आणि पंथियालमध्ये दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत, असे वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले. दगड पडणे थांबताच रस्ता वाहनांच्या येण्या-जाण्यासाठी योग्य बनविता यावा, यासाठी रस्ते सफाई संस्था सज्ज आहेत. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले, की मगरकोट येथे पहाटे एका ट्रक आणि तेलाच्या टँकरमध्ये रोलिंग बोल्डरची टक्कर झाली, यात चालकाचा मृत्यू झाला आणि दोनजण जखमी झाले. चालकाचा मृतदेह शवागारात पाठविण्यात आला आहे, तर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमी लोक तेलाच्या टँकरमधून प्रवास करीत होते.
रामबन सेक्टरमध्ये अजूनही मुसळधार पाऊस पडत आहे, तर बनिहाल आणि काश्मीर खोऱ्यातील बहुतांश भागात आज सकाळी बर्फवृष्टी झाली. हवामान खात्याने दिवसा मैदानी भागात पाऊस आणि मध्यम आणि उच्च उंचीच्या भागात जोरदार हिमवृष्टीचा अंदाज वर्तविला आहे.
भारत जोडो यात्रेच्या पार्श्वभूमीवर, महामार्गावर वाहनांची सुरळीत वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी आणि लोकांची अनावश्यक गैरसोय टाळण्यासाठी वाहतूक विभागाने एक सूचना जारी केली आहे. बत्ती-मात्रा-वन नाका या मार्गावरून जाणाऱ्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर विभागाने हा रस्ता वाहतूक प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. रामबन शहर आणि परिसरातील नागरिकांना रस्त्यावर कोणतेही वाहन उभे न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड