मनसे-शिवसेनेच्या दणक्यानंतर जान कुमार सानूची माफी

मुंबई, २९ ऑक्टोबर २०२०: ‘कलर्स’ वाहिनीच्या ‘बिग बॉस’ या रियालिटी शोमध्ये प्रसिद्ध गायक कुमार सानू यांचा मुलगा जान कुमार सानू या स्पर्धकाने मराठी भाषेची चीड येत असल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या टिप्पणीनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) कलर्स वाहिनीला हा कार्यक्रम बंद ठेवण्याची धमकी दिली. कलर्स चॅनेलच्या माफीनंतर आता बुधवारी जान यांनीही माफी मागितली आहे. मराठी भाषेबद्दलच्या वक्तव्याबद्दल त्यांनी नॅशनल टेलिव्हिजन वर दिलगिरी व्यक्त केली आहे.

या खेळादरम्यान बिग बॉस कडून त्याला असं ठणकावून सांगण्यात आलं होतं की, या खेळामध्ये सर्व जाती, धर्म व भाषांचा सन्मान केला जातो त्यामुळे कोणत्याही भाषेविषयी असे वक्तव्य येथे चालणार नाही. ‘बिग बॉस’ या कार्यक्रमाच्या मंगळवारच्या एपिसोडमध्ये जानने मराठी भाषेवर भाष्य करत असे म्हटले होते की मला मराठी भाषेची चीड येते. खरं तर या कार्यक्रमाचे स्पर्धक राहुल वैद्य आणि निक्की तांबोळी अनेकदा एकमेकांशी मराठी भाषेत बोलतात ज्याला जान सानूने विरोध केला होता. ते म्हणाले की ताकद असेल तर हिंदीत बोला. याबाबत मनसेने तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

मनसे चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी २४ तासांच्या आत माफी मागण्याची मागणी केली होती. अन्यथा चित्रिकरण बंद पाडण्याची धमकी दिली होती. यानंतर कलर्स या मनोरंजन वाहिनीने माफीनामा दिला.

“माझ्याकडून नकळत एक चूक झाली, ज्यामुळे मराठी भाषिकांना आणि त्यांच्या अस्मितेला ठेच पोहोचली आहे. मी मराठी लोकांची मनापासून माफी मागतो. मराठी भाषिकांना वाईट वाटावं, असा माझा हेतू नव्हता. माझ्यामुळे बिग बॉसलाही शरमेने मान खाली घालाली लागली. त्यामुळे बिग बॉसचीही माफी मागतो. अशा प्रकारची चूक पुन्हा होणार नाही, याची मी काळजी घेईन”, अशा शब्दात जान याने माफी मागितली.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा