जनआशिर्वाद यात्रा आणि निवडणूक, नक्की समीकरण काय ?

मुंबई, १९ ऑगस्ट: भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज मुंबईपासून जनआशिर्वाद यात्रेला सुरुवात केली. मात्र १४ तारखेपासून सुरु असलेल्या या शक्तीप्रदर्शनातून भाजपने २०२४ च्या निवडणूकीचा पाया रचला आहे, असं म्हंटल तर वावगं ठरणार नाही. अनेक नेत्यांनी सुरु केलेल्या या यात्रेनंतर आज नारायण राणेंनी आपल्या शक्तीप्रदर्शनाला सुरुवात केली आणि सामर्थ्य दाखवले.
खरतर नारायण राणे म्हणजे एकेकाळचा कणकवलीचा खंदा शिवसैनिक. पण सध्याचे भाजपचे केंद्रीय मंत्री म्हणून मंत्रिमडळ गाजवत आहेत. नारायण राणेंची जनआशिर्वाद यात्रा आज मुंबईपासून सुरु झाली. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करुन आणि बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाच दर्शन घेऊन त्यांनी या यात्रेचा शुभारंभ केला. या यात्रेत देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर सहभागी झाले. देवेंद्र फडणवीस यांनी या यात्रेला झेंडा दाखवला आणि यात्रा सुरु झाली. यावेळी त्यांनी जनतेला संबोधून जनतेची सेवा करण्याचा उद्देश असल्याचं नमूद केलं. देशातला बेरोजगार संपवून उद्योग वाढवून रोजगार उपलब्ध करुन देणं, जनतेच्या हितासाठी काम करणं, अशा महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश त्यांनी यावेळी केला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्याला उद्धवस्त करायला निघाले आहे, असं म्हणून त्यांनी शिवसेनेवर बाण रोखला. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे आभार मानत त्यांनी खास करुन देवेंद्र फडणवीस यांचे नाव घ्यायला ते विसरले नाहीत. त्यांच्यामुळे मी दिल्लीत पोहोचलो. तसेच जेव्हा मंत्रिमंडळात बसलो तेव्हा क्षणभर माझा विश्वासच बसला नाही, असंही त्यांनी यावेळी नमूद केलं. आता सरकार केवळ भाजपचंच येणार असंही त्यांनी यावेळी ठणकावून सांगितलं.
या जनआशिर्वाद यात्रेतून त्यांनी महाराष्ट्राचा विकास हे एकच ध्येय समोर ठेवलं. आणि संपूर्ण जनतेचा मला पाठिंबा मिळेल, अशी आशा व्यक्त केली. त्यामुळे या जनआशिर्वाद यात्रेचा प्रभाव किती पडेल आणि त्याचे परिणाम काय होतील हे  २०२४ मध्ये पाहणं औत्युक्याचं ठरेल, हे मात्र नक्की.
न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस, मुंबई

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा