पुरंदर, दि.१२ सप्टेंबर २०२०: पुरंदर तालुक्यातील सासवड शहरातील वाढता कोरोना प्रसार रोखण्यासाठी सासवड शहर सात दिवस बंद ठेवण्याचा निर्णय सासवडच्या व्यापारी व नागरिकांनी घेतला आहे. बुधवार दि १६ ते २२ सप्टेंबर दरम्यान सासवड मधील सर्व दुकाने व व्यवहार बंद असणार आहेत.
पुरंदर तालुक्यातील सासवड शहरात कोरोनाचे आज पर्यंत ७४२ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्या पैकी १८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे . ५८२ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. तर आजही सासवड मध्ये १४२ रुग्ण उपचार घेत आहेत.
दररोज २५ ते ३० रुग्णाची भर पडत आहे.त्यामुळे सासवड शहरातील लोक हवालदिल झाले आहेत. आज सासवड नगरपरिषदेच्या कार्यालयात सासवड येथील व्यापारी प्रतिनिधी, नगसेवक, नगराध्यक्ष , प्रशासकीय अधिकारी यांची पुरंदर – हवेलीचे आमदार संजय जगताप यांच्या उपस्थितीत एक बैठक घेण्यात आली. यामध्ये कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सात दिवस सासवड शहर बंद ठेवण्याची विनंती मुख्याधिकारी विनोद जळक यांनी केली.
आमदार संजय जगताप यांनी सुद्धा कोरोना साखळी तोडण्यासाठी लोकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. यानंतर बुधवार दि.१६ ते २२ सप्टेंबर दरम्यान सासवड शहर बंद ठेवण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. या सात दिवसात मेडिकल व दुध या अति महत्वाच्या सेवांशिवाय इतर सर्व व्यवसाय बंद राहतील असे मुख्याधिकारी विनोद जळक यांनी सांगितले.
न्यूज अनकट प्रतिनिधी राहुल शिंदे