पुणे, ४ सप्टेंबर २०२३: आशिया चषक (आशिया कप २०२३) खेळणाऱ्या टीम इंडियाला नेपाळसोबतच्या सामन्यापूर्वी मोठा झटका बसला आहे. भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह मुंबईत परतला आहे. जसप्रीत बुमराह वैयक्तिक कारणांमुळे भारतात परतला आहे. मात्र, चाहत्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे तो कदाचित आशिया कप सुपर-४ टप्प्यासाठी संघात सामील होऊ शकतो. आशिया कप २०२३ मध्ये सोमवारी भारताचा सामना नेपाळशी होणार आहे. या सामन्यात बुमराहच्या जागी मोहम्मद शमी खेळणार आहे. जसप्रीत बुमराहच्या अचानक कोलंबोहून मुंबईत परतण्याचे कारण काय, हे अद्याप अधिकृतपणे सांगण्यात आलेले नाही.
आशिया कपमध्ये शनिवारी भारत आणि पाकिस्तानचे संघ आमनेसामने आले होते. पावसामुळे तो सामना रद्द झाला. बुमराहने या सामन्यात फलंदाजी केली पण त्याला पावसामुळे गोलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही. आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघ सोमवारी (आज) नेपाळविरुद्ध खेळणार आहे. यानंतर सुपर-४ फेरी खेळल्या जातील. आशिया चषक स्पर्धेत ६ सप्टेंबरपासून सुपर-४ फेरी होणार आहे.
जसप्रीत बुमराहने आयर्लंडविरुद्धच्या मालिकेतून पुनरागमन केले होते. यापूर्वी जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे मैदानापासून दूर होता. दुखापतीमुळे तो आयपीएल २०२३ चा भागही नव्हता. मागच्या वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत झालेल्या पाठीच्या दुखापतीमुळे (स्ट्रेस फ्रॅक्चर) तो सुमारे ११ महिने क्रिकेटपासून लांब होता.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड