Jayant Narlikar:20 मे 2025 रोजी पुण्यातील राहत्या घरी वयाच्या 86व्या वर्षी ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ, लेखक आणि विज्ञानप्रसारक डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने भारतीय आणि जागतिक विज्ञानविश्वात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. नारळीकर यांना कोणताही दीर्घ आजार नव्हता; वयोमानानुसार प्रकृती खालावली होती आणि ते झोपेतच शांतपणे अनंतात विलीन झाले.
आज घेवूयात त्यांच्या कार्याचा आणि जीवनातील काही रोचक किस्स्यांचा आढावा…
जीवन आणि शिक्षण
जयंत नारळीकर यांचा जन्म 19 जुलै 1938 रोजी कोल्हापूर येथे एका विद्वान कुटुंबात झाला. त्यांचे वडील, रँग्लर विष्णू वासुदेव नारळीकर, बनारस हिंदू विद्यापीठात गणित विभागाचे प्रमुख आणि प्रसिद्ध गणितज्ज्ञ होते, तर आई सुमती नारळीकर या संस्कृत विदुषी होत्या. अशा बौद्धिक वातावरणात वाढलेल्या जयंत यांनी वाराणसी येथे शालेय शिक्षण पूर्ण केले आणि नंतर विज्ञान शाखेत बी.एस्सी. पदवी मिळवली. उच्च शिक्षणासाठी ते ब्रिटनमधील केंब्रिज विद्यापीठात गेले, जिथे त्यांनी बी.ए., एम.ए. आणि पीएच.डी. पदव्या प्राप्त केल्या.
केंब्रिजमध्ये त्यांना प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ सर फ्रेड हॉयल यांचे मार्गदर्शन लाभले. हॉयल यांच्यासोबत त्यांनी ‘हॉयल-नारळीकर सिद्धांत’ (Hoyle-Narlikar Theory) मांडला, ज्यामध्ये स्थिर अवस्था विश्वरचनेच्या (Steady State Cosmology) आधारावर विश्वाच्या उत्पत्ती आणि गुरुत्वाकर्षणाविषयीचे संशोधन केले आहे. या सिद्धांताने त्यांना जागतिक कीर्ती मिळवून दिली.


वैज्ञानिक योगदान
डॉ. नारळीकर यांनी खगोलभौतिकी, गुरुत्वाकर्षण आणि विश्वरचनाशास्त्र यावर सखोल संशोधन केले. त्यांनी मांडलेली ‘कन्फॉर्मल ग्रॅव्हिटी थिअरी’ आणि ‘क्वासी स्टेडी स्टेट थिअरी’ यांनी आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांचे लक्ष वेधले. 1964 मध्ये, वयाच्या अवघ्या 26व्या वर्षी, त्यांनी गुरुत्वाकर्षणाचा नवा सिद्धांत मांडला, ज्यामुळे विश्वनिर्मितीच्या संशोधनाला नवी दिशा मिळाली.
भारतात परतल्यानंतर त्यांनी टाटा मूलभूत संशोधन संस्थेत (TIFR) काम केले आणि 1988 मध्ये पुण्यात ‘इंटर-युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी ॲण्ड ॲस्ट्रोफिजिक्स’ (IUCAA) या संस्थेची स्थापना केली. या संस्थेचे पहिले संचालक म्हणून त्यांनी भारतातील खगोलशास्त्र संशोधनाला चालना दिली. 1972 मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांना परदेशातून भारतात बोलावून टीआयएफआरमध्ये सामील करून घेतले होते.
साहित्यिक आणि विज्ञानप्रसारक
डॉ. नारळीकर केवळ शास्त्रज्ञच नव्हते, तर ते एक उत्कृष्ट लेखक आणि विज्ञानप्रसारकही होते. त्यांनी मराठी आणि इंग्रजी भाषेत विज्ञानकथा, लघुनिबंध आणि पुस्तके लिहिली, ज्यांनी सामान्य माणसापर्यंत विज्ञान पोहोचवले. त्यांच्या ‘यक्षांची देणगी’ या पहिल्याच पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला. ‘आकाशाशी जडले नाते’, ‘अंतराळातील भस्मासूर’, ‘व्हायरस’, ‘कालसर्प’, ‘टाइम मशीनची किमया’ आणि ‘चार नगरांतले माझे विश्व’ यांसारख्या त्यांच्या कृतींनी तीन पिढ्यांवर प्रभाव टाकला.
त्यांनी विज्ञानाला सोप्या आणि रसाळ भाषेत मांडण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या व्याख्यानांमुळे आणि लेखनामुळे लहान मुलांपासून तरुणांपर्यंत सर्वांमध्ये विज्ञानाची गोडी निर्माण झाली. 2021 मध्ये नाशिक येथील 94व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले, जिथे त्यांनी विज्ञानवादी दृष्टिकोन आणि अंधश्रद्धेवर प्रहार करणारे विचार मांडले.
पुरस्कार आणि सन्मान
डॉ. नारळीकर यांना त्यांच्या कार्यासाठी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले:
• पद्मभूषण (1965): वयाच्या अवघ्या 27व्या वर्षी मिळालेला हा सन्मान त्यांच्या असामान्य प्रतिभेचा पुरावा आहे.
• पद्मविभूषण (2004): भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान.
• महाराष्ट्र भूषण (2010): महाराष्ट्र सरकारचा सर्वोच्च पुरस्कार.
• साहित्य अकादमी पुरस्कार (2014): त्यांच्या आत्मचरित्र ‘चार नगरांतले माझे विश्व’ साठी.
• आंतरराष्ट्रीय स्तरावर स्मिथ्स प्राइज, अॅडम्स प्राइज, प्रिक्स ज्युल्स जॅन्सेन आणि कलिंग पुरस्कार यांसारखे सन्मान.
डॉ. जयंत नारळीकर यांचे निधन ही केवळ भारतासाठीच नव्हे, तर जागतिक विज्ञान आणि साहित्य क्षेत्रासाठी मोठी हानी आहे. त्यांनी खगोलशास्त्राला दिलेली नवी दिशा, विज्ञानाला सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आणि मराठी साहित्यातील योगदान यामुळे ते कायम स्मरणात राहतील. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना “विज्ञानाची रहस्ये सहज-सोप्या भाषेत मुलांना समजावणारा तेजस्वी तारा” असे संबोधले, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या निधनाला “ज्ञानवृक्ष उन्मळून पडल्याची” भावना व्यक्त केली.
डॉ. नारळीकर यांचे कार्य आणि त्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहील. त्यांच्या शब्दांत सांगायचे तर, “आकाशाशी जडलेले नाते” त्यांनी प्रत्येकाच्या मनात रुजवले आहे. त्यांचा हा तेजस्वी तारा निखळला असला, तरी त्यांचे विचार आणि साहित्य कायम आपल्याला मार्गदर्शन करत राहील.
न्यूज अनकट प्रतिनिधी – प्रज्ञा शिंदे