गोल पोस्ट इतर राजकारण विधान परिषदेतील अजित पवार गटांचे ५ आमदार अपात्र ठरवा, उपसभापतींकडे जयंत पाटलांचा...

विधान परिषदेतील अजित पवार गटांचे ५ आमदार अपात्र ठरवा, उपसभापतींकडे जयंत पाटलांचा अर्ज

मुंबई, १२ सप्टेंबर २०२३ : अजित पवार गटातील ४१ आमदारांच्या अपात्रेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल केली असतानाच, आता विधान परिषदेतील या गटाच्या पाच आमदारांच्या अपात्रतेच्या कारवाईसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने उपसभापतींकडे सोमवारी दोन स्वतंत्र अर्ज केले आहेत. या अर्जावर आठवड्याभरात सुनावणी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

राष्ट्रवादीचे दोन्ही गट फूट पडली नसल्याचे सांगत असले, तरी दोन्ही गटाकडून एकमेकांना शह-काटशह देण्याचे काम सुरू आहे. पक्ष आणि चिन्ह आपल्याच ताब्यात राहावे, यासाठी दोन्ही गटाकडून कसून प्रयत्न सुरू आहेत. अशातच शरद पवार गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे अजित पवार गटाच्या ४१ आमदारांना अपात्र करण्याची मागणी केली असतानाच, आता विधान परिषदेतीलही पाच आमदारांना निलंबित करण्याबाबत उपसभापती निलम गोऱ्हे यांच्याकडे जयंत पाटील यांनी अर्ज केला आहे.

यासंदर्भात कायदेशीर सल्ला घेऊन लवकरच आठवडाभरात सुनावणी घेतली जाणार आहे. तर शिवसेना शिंदे गटांच्या ४० आमदारांची आणि ठाकरे गटांच्या १४ आमदारांच्या अपात्रे संदर्भातील सुनावणी ही १४ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. राज्य विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात ही सुनावणी होणार असून, एकाच वेळी ५४ आमदारांची सुनावणी घेतली जाणार आहे. त्यासाठी दोन्ही गटाच्या आमदारांना उपस्थित राहावे लागणार आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

error: Content is protected !!
Exit mobile version