सांगली, २४ ऑगस्ट २०२३ : राष्ट्रवादीतील फुटीनंतर अजित पवार यांच्यासोबत अनेक बड्या नेत्यांनी शरद पवार यांची साथ सोडत अजित पवारांचे नेतृत्व मान्य केले. त्यातच आता राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही अजित पवार यांच्या तंबूत जाणार जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. भाजपचे सांगलीचे खासदार संजयकाका पाटील यांनी मिरजेमध्ये पार पडलेल्या एका कार्यक्रमाप्रसंगी एक वक्तव्य केल आहे. जयंत पाटील भाजपात येतील असे संकेत सांगलीचे भाजपा खासदार संजय पाटील यांनी यावेळी दिले.
भाजपाच्या होकायंत्रांचा इशारा असून लवकरच त्यांचा प्रवेश होईल, अशी दिशा धरुया अशा शब्दात खासदार संजय पाटील यांनी सूचक वक्तव्य केले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. सध्या महापालिका क्षेत्रातील जयंत पाटील गटाचे राष्ट्रवादीचे पदाधिकारी अजित पवारांच्या गटात दाखल झालेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये जयंत पाटील कुठे जाणार? चर्चा सुरू आहेत. यावरून भाजपचे खासदार संजय पाटील यांनी जयंत पाटील आता कुठे जाणार असा प्रश्न उपस्थित करताना जयंत पाटील यांचा भाजपा प्रवेश होईल, असे संकेत दिले आहेत.
दरम्यान, याआधी जयंत पाटील यांनी आपण शरद पवार यांच्यासोबत राहणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्याचवेळी अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीदरम्यान जयंत पाटील देखील तिथे उपस्थित होते. ही कौटुंबिक भेट असल्याचे सांगितले जात होते. पण जयंत पाटील हे तर कुटुंबातील नाहीत, मग ते तिथे कसे, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. सांगली जिल्हा हा जयंत पाटलांचा बालेकिल्ला समजला जातो. जिल्ह्यातील सत्ता स्थानांवर त्यांच्याच गटाचे सर्वाधिक प्राबल्य आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादीला खिंडार पाडल्यानंतर कमी अधिक प्रमाणात सर्वच जिल्ह्यात त्याचे पडसाद उमटले, पण सांगली राष्ट्रवादीमध्ये कोणताही धक्का पोहोचलेला नाही.
न्यूज अनकट प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे