पुणे १२ फेब्रुवारी २०२५ : नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) द्वारे घेण्यात आलेल्या जेईई मेन परीक्षेचा निकाल अखेर जाहीर झाला आहे. यावर्षीच्या निकालात 14 विद्यार्थ्यांनी 100 पर्सेंटाइल गुण मिळवून इतिहास रचला आहे, ज्यात महाराष्ट्राच्या विशाद जैनने देशात पहिला क्रमांक पटकावून राज्याची मान उंचावली आहे.
95.93% विद्यार्थी उत्तीर्ण
यंदाच्या परीक्षेत 95.93% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत आणि ते आता जेईई ऍडव्हान्स (JEE Advanced 2025) साठी पात्र ठरले आहेत. आयआयटी, एनआयटी, ट्रिपल आयटी आणि राष्ट्रीय स्तरावरील अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी जेईई मेन आणि जेईई ऍडव्हान्स परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
देशभरातील 628 केंद्रांवर परीक्षा पार पडल्या :
जानेवारी 2025 मध्ये जेईई मेनचे पहिले सत्र आयोजित करण्यात आले होते. देशभरातील 304 शहरांमधील 628 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. पेपर 1 ची परीक्षा 22, 23, 24, 28 आणि 29 जानेवारीला, तर पेपर 2A आणि 2B ची परीक्षा 30 जानेवारीला घेण्यात आली होती.
जेईई मेन उच्च शिक्षणाचे प्रवेशद्वार :
जेईई मेन परीक्षा बी.टेक, बी.आर्क, बी.प्लॅनिंग यांसारख्या पदवीपूर्व तांत्रिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी घेतली जाते. राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (NIT), भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था (IIIT) आणि इतर प्रमुख संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी जेईई मेन हा पहिला टप्पा आहे.
आता जेईई ऍडव्हान्सची प्रतीक्षा :
जेईई मेन परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे लक्ष आता जेईई ऍडव्हान्स परीक्षेवर केंद्रित झाले आहे. विद्यार्थ्यांना यापुढील टप्प्यांसाठी तयारी सुरू करण्याचा उत्साह आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे