नवी दिल्ली, २६ ऑगस्ट २०२०: विद्यार्थ्यांचा विरोध असूनही जेईई-एनईईटी परीक्षा सप्टेंबर महिन्यातच घेण्यात येणार आहेत. परीक्षा घेणाऱ्या राष्ट्रीय चाचणी संस्थेने त्यासंदर्भातील आराखडा जाहीर केला आहे. या परीक्षा १ सप्टेंबरपासून सुरू होणार असल्याचे एजन्सीच्या प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना ध्यानात घेऊन परीक्षा कशा घेण्यात येतील हे एजन्सीने त्यांच्या वतीने स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. जेईई परीक्षा १ ते ६ सप्टेंबर दरम्यान घेण्यात येईल, तर एनईईटी परीक्षा १३ सप्टेंबरला होणार आहे. या एजन्सीचा दावा आहे की ९९ टक्के विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचे परीक्षा केंद्र देण्यात आले आहे.
सर्वात मोठी चिंता ही कोरोना काळात एवढी मोठी परीक्षा मोठ्या प्रमाणात कशी घेण्यात येईल याची होती. विद्यार्थ्यांची ही समस्या लक्षात घेऊन नॅशनल टेस्टिंग एजन्सीने सामाजिक अंतर कायम ठेवण्यासाठी अधिक परीक्षा केंद्र बनवित असल्याचे म्हटले आहे. तसेच परीक्षा केंद्रांवर बसण्याची व्यवस्था अशा प्रकारे केली जाईल की सोबतची जागा रिक्त ठेवता येईल.
नीट (यूजी) परीक्षांबाबत एजन्सीचे म्हणणे आहे की आता प्रत्येक खोलीत २४ एवजी केवळ १२ विद्यार्थी परीक्षा देतील. परीक्षा केंद्राबाहेरही सामाजिक अंतर पाळले जावे, यासाठी विद्यार्थ्यांना प्रवेश व बाहेर जाण्यासाठी वेगवेगळा वेळ देण्यात येईल. विद्यार्थी परीक्षा केंद्रांवर जमून परीक्षा सुरू होण्याची प्रतीक्षा करीत असतानाही सामाजिक अंतर पाळले जाण्याची व्यवस्था केली जाईल.
अशा वेळी काय करावे आणि काय करू नये याबद्दल सर्व विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शक सूचना देण्यात येईल. आता जेईईसाठी ५७० ऐवजी ६६० केंद्रे असतील, तर एनईईटीसाठी २५४६ ऐवजी ३८४३ केंद्रे असतील.
परीक्षा कशा घेण्यात येतील या संदर्भात राष्ट्रीय चाचणी संस्थेने सर्व राज्यांची मदतही मागितली आहे. विशेषत: विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर वेळेत पोहोचता यावे यासाठी सुरळीत वाहतूक व्यवस्था देण्याची मागणी होत आहे. एनटीएने असे आश्वासन दिले आहे की जेव्हा परीक्षा घेतल्या जातात तेव्हा विद्यार्थ्यांची सुरक्षा सर्वोतोपरी असते आणि हे लक्षात घेऊन सर्व तयारी केली जाईल.
न्यूज अनकट प्रतिनिधी