जेजुरी देवसंस्थानच्या विश्वस्तपदाचा वाद चिघळला, रास्ता रोकोसह अर्धनग्न मोर्चा

3

जेजुरी (पुणे) , २६ मे २०२३ : महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीच्या श्री खंडोबा देवाच्या श्री मार्तंड देवसंस्थानच्या विश्वस्त पदी सात पैकी केवळ एकच स्थानिक विश्वस्ताची निवड करण्यात आली, उलट सहा जण बाहेरगावचे विश्वस्त नेमण्यात आले. यांच्या निषेधार्थ जेजुरी ग्रामस्थांच्या वतीने आज सकाळपासून विविध आंदोलनाला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या श्री खंडोबा मंदिरांचे व्यवस्थापन पाहणाऱ्या श्री मार्तंड देवसंस्थानच्या विश्वस्ताची निवड प्रक्रिया गेली सहा महिने सुरू होती.

या विश्वस्त पदावर देवाची महती, देवकार्य माहिती असणाऱ्या जेजुरीतील स्थानिकांची निवड करावी अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली होती. चार दिवसांपूर्वी पुणे धर्मादाय आयुक्त कार्यालयाने नवीन विश्वस्त मंडळ जाहीर केले. यात बाहेरील गावातील सहा व केवळ एकच स्थानिक विश्वस्त निवडला गेला. बाहेरील विश्वस्त नियुक्तीच्या निषेधार्थ गुरुवारी ग्रामस्थांची बैठक होऊन यात आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता.

आज सकाळी ११ वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आंदोलनाला सुरुवात केली. छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रथम रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यानंतर जेजुरी शहरांतून मोर्चा काढण्यात आला. जेजुरी गडाच्या पायथ्याशी निषेध व्यक्त करुन घोषणा देण्यात आल्या. श्री मार्तंड देवसंस्थानच्या मल्हार भक्त निवासासमोर चक्री उपोषण सुरू करण्यात आले. या मोर्चात सर्वपक्षीय कार्यकर्ते, आजीमाजी विश्वस्त, माजी नगरसेवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा