मुंबई: ज्येष्ठ पत्रकार आणि अग्रलेखांचे बादशाह म्हणून ओळखले नीळकंठ खाडिलकर यांचे आज पहाटे अल्पशा आजारानं निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. मुंबईतील लिलावती रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांचे पार्थिव दुपारी १२ ते २ या दरम्यान नवाकाळच्या गिरगाव येथील कार्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
६ एप्रिल १९३४रोजी खाडिलकर यांचा जन्म झाला. अर्थशास्त्र विषयासह त्यांनी बीए ऑनर्सचे शिक्षणही पूर्ण केले होते. अग्रलेखांचा बादशाह खाडिलकर यांची ओळख होती. तसेच दै.नवाकाळ या वृत्तपत्राचे ते अनेक वर्षे संपादकही राहिले होते. अग्रलेखांव्यतिरिक्त एक उत्तम मुलाखतकार म्हणूनही त्यांची ओळख होती. गोळवलकर गुरूजी, सत्यसाईबाबा यांच्या त्यांनी घेतलेल्या मुलाखती फार गाजल्या होत्या.
ज्येष्ठ नाटककार आणि ‘केसरी’चे माजी संपादक कृ.प्र.खाडिलकर यांचे नातू होते. दुपारी ३ वाजता मरीन लाईन्स येथील चंदनवाडी स्मशानभूमीत नीळकंठ खाडिलकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.