केवळ ३ मिनिटात लुटले दोन कोटींचे दागिने, मुंबईतील घटना

मुंबई, ९ जानेवारी २०२१: मुंबईत चोरट्यांनी केवळ तीन मिनिटांमध्ये दागिन्यांच्या दुकानावर दरोडा टाकला आहे. चित्रपटात दाखवल्या जाणाऱ्या चोरी प्रमाणेच केवळ तीन मिनीटात चोरट्यांनी ही चोरी केली. या चोरीत त्यांनी तब्बल २ कोटी सोन्याचे दागिने व हिरे लंपास केले आहेत. हे आरोपी चोरी करण्यासाठी दोन दुचाकींच्या साह्याने आले होते. परंतु, पळता वेळेस त्यातील एक दुचाकी सुरू झाली नाही. त्या कारणाने दोन चोरट्यांना धावत तेथून पळ काढावा लागला. त्यांच्या हातात शस्त्रं देखील होती. त्यामुळे त्यांचा पाठलाग करण्यासाठी कोणीही पुढे आले नाही.

चोरीचा हा धक्कादायक प्रकार मिरारोड, शांतीनगर या भागात घडला आहे. येथे दिवसा ढवळ्या चोरट्यांनी एस कुमार गोल्ड अँड डायमंड ज्वेलरी शॉप या दुकानाला आपले लक्ष बनविले. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, चोरी करण्यासाठी चार इसम आले होते. ज्यांच्याकडे दोन दुचाकी होत्या. दुपारी दोनच्या सुमारास हे चारही चोरटे दुकानामध्ये आले. दुकानात प्रवेश करताच चोरट्यांनी दुकानातील कामगारांना आपल्या बोलण्यामध्ये गुंतवून ठेवले.

यानंतर काही क्षणात त्यांनी आपल्या बंदुका दुकानातील कामगारांवर रोखल्या आणि काही मिनिटातच दुकानातील सोने आणि हिरे आपल्या बॅगांमध्ये भरण्यास सुरुवात केली. हा सर्व प्रकार दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाला आहे. घटनेच्या वेळी काही लोकांनी आरोपींना अडवण्याचा प्रयत्न केला. परंतु, आरोपींच्या हातातील बंदुका पाहून कोणीही पुढे जाण्यास हिम्मत केली नाही.

चोरी केल्यानंतर आरोपीने तिथून पळ काढला. दुकानाच्या बाहेर दोन आरोपी आधीपासूनच आपल्या दुचाकी वर पळून जाण्यासाठी तयार होते. दुकानातील आरोपी चोरी करून दुचाकीच्या दिशेने धावले, त्यातील एक दुचाकी प्रसंगी सुरू न झाल्याने यातील दोन आरोपी पळून जाण्यास यशस्वी झाले. उर्वरित दोन आरोपींनी आपली दुचाकी चालू करण्यासाठी प्रयत्नदेखील केले मात्र, ती सुरू झाली नाही. यानंतर उर्वरित दोन्ही आरोपींनी आपली दुचाकी तेथेच सोडून धाव ठोकली.

स्थानिक अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार दुकानदाराने दोन कोटी रूपयांचे दागिने चोरी गेले असल्याचा दावा केला आहे. पोलीस सीसीटीव्हीच्या माध्यमातून चोरट्यांचा तपास लावण्याचा प्रयत्न करत आहेत. दुचाकीवरील वाहन क्रमांकाच्या सहाय्याने पोलीस आरोपींचा शोध लावण्याचा प्रयत्न करत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा