झारखंड, २९ जुलै २०२३ : झारखंडमधील बोकारो येथे मोहरमच्या मिरवणुकीत मोठी दुर्घटना घडली. येथे मिरवणुकीतील ताबूत हायटेंशन विद्युत तारेच्या संपर्कात आल्याने एकूण १३ जण गंभीररित्या भाजले असून त्यापैकी चौघांचा मृत्यू झाला. उर्वरित ९ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी ६ च्या सुमारास बोकारोच्या बर्मो भागातील शेतात ही दुर्घटना घडली. मोहरममध्ये सर्वजण ताजिया घेऊन जात असताना, ताबूत ११,००० व्होल्ट वायरच्या संपर्कात येऊन हि दुर्घटना घडली.
घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, ताजिया उचलत असताना वरून जाणारी ११,००० ची हायटेंशन लाईन ताजियामध्ये अडकली, त्यामुळे ताजियाच्या मिरवणुकीत ठेवलेल्या बॅटरीचा स्फोट झाला. यामुळे अनेक लोक गंभीररित्या होरपळले. स्थानिक लोकांच्या मदतीने जखमींना तातडीने डीव्हीसी बोकारो थर्मल हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले.
या घटनेमध्ये गंभीररित्या जखमी झालेल्या चौघांचा मृत्यू झाला असून इतर नऊ जखमींची प्रकृती अद्याप चिंताजनक आहे. तसेच यावेळी रुग्णालयात रूग्णवाहिका नसल्याने आणि रूग्णालयातील एकंदर गलथान कारभारामुळे लोकांनी एकच गोंधळ घातला.
न्युज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर