गोल पोस्ट इतर “झुरळा” मुळे दोन प्रवाशांना मिळाला मोफत प्रवास

“झुरळा” मुळे दोन प्रवाशांना मिळाला मोफत प्रवास

पुणे : दोन प्रवाशी विमान प्रवास करत असताना त्यांच्या बसण्याच्या आसनाखाली झुरळ निघाले. त्यामुळे त्या दोन प्रवाशांनी इंडिगो विमान कंपनीच्या विरोधात ग्राहक मंचाकडे तक्रार दाखल केली आहे. ग्राहक तक्रार निवारण मंचाने प्रवाशांना ५० हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्याचा आदेश दिला. याशिवाय संबंधित विमान प्रवाशांना तिकिटाची रक्कम नऊ टक्के व्याजदराने परत करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

या प्रकरणी स्कंद असीम बाजपेयी (रा. कल्पिका अपार्टमेंट, शीला विहार कॉलनी, कोथरूड) आणि सुरभी राजीव भारद्वाज (रा. वनराई हाइटस्, एमआयटी कॉलेज रस्ता, कोथरूड) यांनी इंडिगो आणि भारतीय विमानतळ प्राधिकरण यांच्याविरुद्ध ग्राहक मंचाकडे तक्रार केली होती.

याबाबतची अधिक माहिती अशी की, बाजपेयी आणि भारद्वाज हे दोघे ३१ डिसेंबर २०१८ रोजी इंडिगो विमान कंपनीच्या विमानातून पुणे ते दिल्ली प्रवासाला निघाले होते.
विमान प्रवासात त्यांच्या आसनाखाली झुरळ निघाल्याने त्यांनी त्वरित तो भाग निर्जंतुक करण्याची विनंती विमानातील कर्मचाऱ्यांकडे केली. मात्र निर्जंतुकीकरण करणे शक्य नसल्यामुळे त्यांनी याबाबतची तक्रार मोबाइल मेसेज आणि ई-मेलद्वारे नोंदविण्यास सांगितले होते.

दिल्ली विमानतळावर उतरल्यानंतर बाजपेयी आणि भारद्वाज या दोघांनी विमान कंपनीकडे तक्रार नोंदवली. मात्र तक्रारदाराने केलेली तक्रार गंभीर नसल्याचे कंपनीकडून कळविण्यात आले. त्यानंतर त्यांनी ग्राहक मंचाकडे तक्रार दाखल केली.

याबाबत बाजपेयी यांनी तक्रारीत नमूद केले होते की, ‘माझ्या हाताला जखम झाली होती. झुरळापासून बचाव करताना मला वेदना झाल्या. मला संसर्गजन्य आजार असल्याने मला झुरळाचा त्रास झाला.’ याबाबत तक्रार करूनही योग्य दखल घेतली गेली नाही. त्यामुळे नुकसानभरपाई आणि तक्रार खर्चाची रक्कम देण्याची मागणी बाजपेयी आणि भारद्वाज यांनी केली होती. ग्राहक तक्रार निवारण मंचाचे अध्यक्ष उमेश जावळीकर, सदस्या क्षितीजा कुलकर्णी, संगीता देशमुख यांनी तक्रारदाराला ५० हजार रुपयांची नुकसानभरपाई आणि नऊ टक्के व्याजदराने तिकीटाची रक्कम परत करण्याचे आदेश दिले आहेत.

.

error: Content is protected !!
Exit mobile version