नागपूर : नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना धक्का बसला आहे. नितीन गडकरींचं मूळ गाव असलेल्या धापेवाडा आणि बावनकुळेंचं मूळ गाव कोराडी येथे भाजपला पराभवाला सामोरं जावं लागलं आहे.
धापेवाड्यामध्ये काँग्रेसचे उमेदवार महेंद्र डोंगरे विजयी झाले आहेत. तर चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कोराडी जिल्हा परिषद सर्कलमध्ये काँग्रेसचे उमेदवार नाना कंभाले विजयी झाले आहेत.
फडणवीस सरकारमध्ये ऊर्जा विभागाचं कॅबिनेट मंत्रिपद सांभाळणाऱ्या चंद्रशेखर बावनकुळे यांना विधानसभा निवडणुकीत तिकीट नाकारण्यात आलं होतं. यामुळे बावनकुळे यांचा तेली समाज चांगलाच नाराज असल्याचे बोलले जात होते. या नाराजीचा प्रत्यय जिल्हा परिषद निवडणुकांच्या निकालातून आल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान, नागपूर हिंगणातून माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते रमेश बंग यांचे पुत्र दिनेश बंग विजयी झाले आहेत.












































