ठाणे, १२ नोव्हेंबर २०२२ : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी विवियाना मॉलमधील ‘हर हर महादेव’ या चित्रपटाचा शो बंद पाडला होता. याप्रकरणी अटक झाल्यानंतर कोर्टाने आव्हाड यांना आज १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. पण आता आव्हाडांना जामीन मिळाला असून न्यायालयाने आव्हाडांच्या वकिलांचा अर्ज मान्य केला आहे. यामुळे जितेंद्र आव्हाडांसह १२ जणांना कोर्टाने १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन दिला आहे.
आव्हाडांना हा जामीन न्यायाधीश बी एस पाल यांनी काही अटी शर्तींसह दिला आहे.आव्हाडांना तपासात सहकार्य करणे, बोलावल्यास चौकशीस जाणे, साक्षीदारांशी संपर्क करु नये, तपासात बाधा आणू नये अशा अटी घालण्यात आल्या आहेत.
न्यायालयाच्या परिसरात आव्हाड यांच्या अटकेनंतर त्यांचे समर्थक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने आंदोलन केले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून आव्हाड यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. विशेष म्हणजे यामध्ये महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येत होत्या. तर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आव्हाड यांच्या अटकेचा निषेध केला होता. दरम्यान, कुठलाही प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात केला होता. तसेच कोर्टाच्या दिशेने येणारे तिन्ही रस्ते पोलिसांकडून बंद करण्यात आले होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी – सुरज गायकवाड