केळी पिकाखालील क्षेत्र वाढविण्यासाठी समूह पद्धतीने विकास करण्यात येणार, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी

26
केळी पिकाखालील क्षेत्र वाढविण्यासाठी समूह पद्धतीने विकास करण्यात येणार, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी
केळी पिकाखालील क्षेत्र वाढविण्यासाठी समूह पद्धतीने विकास करण्यात येणार, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी

Pune : आगामी पाच वर्षात जिल्ह्यात केळी पिकाखाली अधिकाधिक क्षेत्र आणण्यासह उत्पादकता वाढविणे, प्रक्रियाउद्योग, शीतसाखळी निर्मिती आणि बाजारपेठ जोडणी या सर्व बाबींचे नियोजन करत समूह (क्लस्टर) पद्धतीने विकास करण्यात येणार असून त्यासाठी कृषी विभागासह सर्व संबंधित विभागांनी एकत्रित प्रयत्न करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे, आत्माचे प्रकल्प संचालक सूरज मडके, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महानंद माने आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डूडी म्हणाले, केळीची उत्पादकता प्रतिहेक्टरी ४२ वरून ६५ मे. टन पर्यंत वाढवण्यासाठी शेतीतील अत्याधुनिक तंत्रज्ञान, निविष्ठांचा योग्य वापर, अधिकाधिक क्षेत्र सेंद्रिय, नैसर्गिक शेतीखाली आणणे, पाण्याचा कार्यक्षम वापर, या पिकासाठीची सर्व टप्प्याची प्रमाणित कार्यपद्धती तयार करणे या बाबींवर विशेष भर द्यावा लागेल. कृषी विद्यापीठे आणि प्रगतशील केळी उत्पादक शेतकऱ्यांकडील तंत्रज्ञान अन्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे, या क्षेत्रातील शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत निविष्ठा पुरवठा, ड्रोन सारखे अत्याधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे आदी कामे करावी लागतील.

केळी पिकाखाली इंदापूर, बारामती आणि जुन्नर तालुक्यामध्ये १ हजार ६११ हेक्टर क्षेत्र असून ६७ हजार ६०० मे. टन उत्पादन होते. आगामी पाच वर्षात हे क्षेत्र ३ हजार हेक्टरवर आणि उत्पादन सुमारे २ लाख मे. टन वर नेण्याचे उद्दिष्ट असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी काचोळे यांनी सांगितले.

या उत्पादन वाढीसाठी तसेच वाढणाऱ्या उत्पादनावरील प्रक्रियेसाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांना विविध योजनेतून अर्थसाहाय्य करणे, शीतसाखळी अंतर्गत साठवण गृहे उभारणी आणि बाजार जोडणीसाठी पणन मंडळ तसेच अन्य माध्यमांचा उपयोग करावा, असेही जिल्हाधिकारी डूडी म्हणाले.

यावेळी स्ट्रॉबेरी, मिरची, आंबा, स्वीट कॉर्न व बेबी कॉर्न, सूर्यफूल आदी पिकांचे क्लस्टर करण्याच्यादृष्टीनेही चर्चा झाली.

न्यूज अनकट प्रतिनिधी,वैभव वायकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा