जेएनयू हल्ल्याप्रकरणी आईशी घोषसह १९ जणांविरोधात गुन्हा दाखल

नवी दिल्ली: जवाहरलाल नेहरू विद्यापीठ विद्यार्थी संघटनेची अध्यक्षा आईशी घोषसह १९ जणांविरुद्ध दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. चार जानेवारी रोजी विद्यापीठातील सर्व्हर रुमची तोडफोड आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्याच्या आरोपात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्यापीठ प्रशासनाच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
रविवारी जेएनयू येथे झालेल्या हल्ल्यात आईशी घोषवर प्राणघातक हल्ला झाला होता. जेएनयूत रविवारी काही जणांनी जेएनयू विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह विद्यार्थ्यांवर हल्ला केला होता. त्यानंतर विद्यापीठ प्रशासनावर अनेकांनी टीका केली होती. त्याआधी फी वाढ विरोधी आंदोलन जेएनयू विद्यार्थी संघटनेने पुकारले होते. या आंदोलनाचा भाग म्हणून सबमिशन्स, परिक्षांवर बहिष्कार घालण्याचे आवाहन करण्यात आले होते.
या आवाहनानंतर चार जानेवारी विद्यापीठाच्या सर्व्हर रुमची तोडफोड करण्यात आली. ही तोडफोड जेएनयू विद्यार्थी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी केल्याचा आरोप करण्यात आला होता. पाच जानेवारीला याप्रकारची विद्यापीठ प्रशासनाने तक्रार पोलिसांकडे केली होती.
अखेर आज पोलिसांनी जेएनयू विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आईशी घोषसह १९ जणांविरोधात एफआयआर दाखल केला आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा