अवघ्या १२ दिवसांत ५.४ सेंटीमीटर खचला जोशीमठ; पहा धक्कादायक सॅटेलाईट फोटो

नवी दिल्ली, १३ जानेवारी २०२३ : उत्तराखंड येथील जोशीमठ येथे भूस्खलन होत आहे. तेथील स्थानिक रहिवाशांना केंद्र सरकारकडून बाहेर काढण्यात येत असून स्थानिकांसाठी हा चिंतेचा विषय बनला आहे. त्यातच नुकताच इस्त्रोच्या सॅटेलाईटने एक फोटो जाहीर केला असून, त्यामध्ये जोशीमठ येथील बराच मोठा भाग खचणार असल्याचा धोका इस्त्रोने दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इस्रोने आपल्या उपग्रहाच्या माध्यमातून जोशीमठच्या परिस्थितीचा आढावा घेतला आहे. या उपग्रहाने दिलेल्या माहितीनुसार, लवकरच जोशीमठ पूर्णपणे उद्ध्वस्त होणार आहे. इस्रोने आपल्या उपग्रहाच्या माध्यमातून ७ ते १० जानेवारी २०२३ या कालावधीमध्ये जोशीमठचे फोटो घेतले आहेत.

यापूर्वी एप्रिल ते नोव्हेंबर २०२२ दरम्यान, जमीन खचण्याचा वेग कमी होता. या कालावधीत जोशीमठ ८ ते ९ सेंटिमीटरपर्यंत खचला होता. पण २७ डिसेंबर पासून ८ जानेवारी २०२३ पर्यंतच्या १२ दिवसांमध्ये ही तीव्रता ५.४ सेंटीमीटर झाली आहे, त्यामुळे जमीन खचण्याचा वेग वाढला आहे.

दरम्यान, इस्रोच्या (ISRO) उपग्रहाकडून जोशीमठचा फोटोही जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये पिवळ्या रंगाने जो भाग दाखवला आहे, तो जोशीमठ शहराचा आहे. यामध्ये आर्मी हेलिपॅड आणि नरसिंह मंदीर दाखवण्यात आले आहे. इस्रोच्या हैद्राबाद इथल्या नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटरकडून हा अहवाल जारी करण्यात आला आहे.

सध्या सरकारकडून जोशीमठ इथल्या लोकांना धोकादायक क्षेत्रातून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून जोशीमठ इथं भूस्खलन आणि जमिनीला भेगा पडत असल्याची माहिती मिळत आहे. ७०० हून अधिक घरांना भेगा पडल्या आहेत. तर रस्ते, हॉटेल, दवाखाने यांच्या भिंतींनाही भेगा पडल्या आहेत.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा