पत्रकारांना सुद्धा शासनाच्यावतीने विमा कवच देण्यात यावे

9

पुरंदर, दि.१८ सप्टेंबर ,२०२०: शासनाने पत्रकारांना कोरोना योद्धा म्हणून घोषित केले असले तरी कोरोना काळात कोरोना आजारामुळे मृत्यू पावणाऱ्या पत्रकारांना अद्याप तरी कोणतेच विमा संरक्षण नाही. त्यामुळे शासनाने पत्रकारांना ५० लाखाचे विमा कवच द्यावे अशी मागणी पुरंदर तालुका पत्रकार संघाच्यावतीने करण्यात आली आहे. याबाबतचे एक पत्र पत्रकार संघाच्यावतीने आज पुरंदरच्या तहसीलदार रूपाली सरनौबत यांच्याकडे देण्यात आले आहे.

पत्रकार हा कोरोना पसरत असताना सुद्धा विविध वृत्तपत्रांमधून इलेक्ट्रॉनिक मिडीयम मधून तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांमधून कोरोनाबाबतची जनजागृती करत आहे. कोरोना काळात लोकांना सर्व माहिती पुरवीत आहे. यासाठी त्याला स्वतःचा जीव धोक्यात घालून इतरत्र फिरावे लागते. बातम्या संकलन करत असताना कोरोना संसर्गित व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे पत्रकारांना सुद्धा आपला जीव गमवावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे शासनाने पत्रकारांना ५० लाखाचे विमा कवच द्यावे या मागणीसाठी आज राज्यभरात तालुक्याच्या ठिकाणी पत्रकारांकडून आंदोलने करण्यात येत आहेत.

यामध्ये तालुक्याच्या ठिकाणी तहसीलदार यांच्याकडे मागणी बाबतचे निवेदन देणे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना एसएमएस’द्वारे विमा कवच देण्याची मागणी करणे इत्यादी कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचबरोबर जिल्हा प्रशासनाकडे सुद्धा याबाबतची मागणी बाबत निवेदन देण्यात येत आहे. पत्रकार संघाचे जिल्हा पदाधिकारी याबाबतचे निवेदन जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांकडे देत आहेत. आज पुरंदर तालुक्यामध्ये सुद्धा पत्रकार संघाच्यावतीने या मागणीचे पत्र तहसीलदारांकडे देण्यात आले. यावेळी पुरंदर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष दत्तानाना भोंगळे, उपाध्यक्ष राहुल शिंदे, सचिव योगेश कामठे, पत्रकार संघाचे सदस्य भरत निगडे, निलेश जगताप आदी उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी : राहुल शिंदे