पुणे, 16 जून 2022: अग्निपथ योजनेबाबत देशातील अनेक राज्यांमध्ये आंदोलनं होत आहेत. यामध्ये बिहारमधील तरुण सर्वाधिक संतप्त आहेत. सैन्यात भरतीच्या नव्या योजनेबाबत बिहारमध्ये रस्त्यावर उतरलेल्या आंदोलक विद्यार्थ्यांच्या अनेक चिंता आहेत. यातील सर्वात मोठा प्रश्न म्हणजे ते सैन्यात भरती होण्यासाठी खूप मेहनत करतात. मग एवढी मेहनत करून चार वर्षेच नोकरी मिळाली तर उपयोग काय?
विविध मंत्रालये, निमलष्करी दलात अग्निवीरांना प्राधान्य मिळंल, असे केंद्र सरकार, राज्य सरकार सांगत असंल, पण तरुणांचे यावर समाधान नाही. चार वर्षांनी ते काय करतील हीच त्यांची मोठी चिंता आहे. आत्तापर्यंत सैन्यात शारीरिक भरतीची प्रक्रिया सुरू असतानाही अद्याप त्यांना सैन्यात नोकऱ्या मिळाल्या नसल्याचाही या विद्यार्थ्यांमध्ये संताप आहे.
अग्निपथ योजनेला तरुणांचा विरोध का?
बिहारसह अनेक राज्यांतील विद्यार्थी अग्निपथ योजनेच्या नियमांवर नाराज आहेत. अग्निपथ योजनेंतर्गत सैन्यात चार वर्षांच्या करारावर भरती होणार असल्याचं ते सांगतात. मग सक्तीची सेवानिवृत्ती दिली जाईल आणि ग्रॅच्युइटी किंवा पेन्शनसारखे फायदेही मिळणार नाहीत जे त्यांच्या दृष्टीनं योग्य नाही.
गुरुवारी बिहारमधील मुझफ्फरपूर जिल्ह्यातही प्रचंड आंदोलन करण्यात आलं. ज्या भागातून मोठ्या संख्येने तरुण सैन्यात भरती होण्यासाठी जातात त्या भागांमध्ये याचा समावेश आहे.
मुझफ्फरपूरमध्ये आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की, गेल्या दोन वर्षांपासून सैन्य भरती रखडली आहे. त्यांनी भरतीसाठी आवश्यक शारीरिक चाचणी देखील उत्तीर्ण केलीय, तरीही त्यांना नोकरी मिळत नाही. दरम्यान, सैन्यात नोकरीचे नवे नियम आणणे म्हणजे हतबलतेसारखे आहे.
याशिवाय असे अनेक तरुण आहेत जे गेल्या तीन वर्षांपासून सैन्यात भरती होण्याच्या मार्गावर आहेत. कोरोनामुळं सैन्य भरती बंद राहिली, आता मोठ्या संख्येने तरुण ओव्हरएज झाले आहेत. दरम्यान, आता अग्निपथ योजना देखील वयाच्या 21 वर्षापर्यंत लागू करता येणार आहे.
अशा स्थितीत अग्निपथ धोरण लागू झाल्यानंतर लष्कर भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या आणि ज्यांनी लेखी परीक्षा, लष्कर भरतीसाठी शारीरिक चाचणी दिलीय, त्यांच्याही आशा मावळल्या आहेत, असं तरुणांचं म्हणणं आहे.
‘चार वर्षांनी कुठं जाणार?’
आंदोलन करणारे विद्यार्थी प्रचंड संतप्त दिसत होते. एका विद्यार्थ्याने सांगितलं की, आम्ही सैन्यात भरती होण्यासाठी खूप मेहनत करतो. ते चार वर्षांपर्यंत कसे मर्यादित ठेवता येईल? केवळ तीन वर्षांच्या प्रशिक्षणानंतर आपण देशाचे रक्षण कसं करू शकतो? सरकारने ही योजना मागं घ्यावी.
जहानाबादमध्ये आंदोलन करणाऱ्या एका विद्यार्थ्याने म्हटलं की, चार वर्षांनी आम्ही कुठे कामावर जाणार? चार वर्षांच्या सेवेनंतर आम्ही बेघर होऊ. त्यामुळे आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत. आंदोलक म्हणाले की, देशातील नेत्यांना जनता जागरूक आहे हे समजून घ्यावं लागेल.
काय आहे अग्निपथ योजना?
भारतीय लष्करात प्रथमच अशी योजना सुरू करण्यात आलीय, ज्यामध्ये अल्पावधीसाठी सैनिकांची भरती केली जाणार आहे. या योजनेंतर्गत दरवर्षी सुमारे 40-45 हजार तरुणांना सैन्यात भरती केलं जाईल. या तरुणांचे वय 17 ते 21 वर्षे वयोगटातील असंल.
ही भरती गुणवत्ता आणि वैद्यकीय चाचणीच्या आधारे केली जाईल.
या चार वर्षांत सैनिकांना 6 महिन्यांचं मूलभूत लष्करी प्रशिक्षण दिलं जाणार आहे.
30-40 हजार मासिक पगारासह इतर फायदेही दिले जातील.
पहिल्या वर्षी 30 हजार, दुसऱ्या वर्षी 33 हजार, तिसऱ्या वर्षी 36500 आणि चौथ्या वर्षी 40 हजार रुपये मिळतील.
चार वर्षे पूर्ण झाल्यानंतर या सर्व अग्निवीरांची सेवा संपुष्टात येईल आणि त्यानंतर नव्याने भरती करण्यात येणार आहे.
सेवा पूर्ण करणाऱ्या 25 टक्के अग्निवीरांची होणार कायमस्वरूपी केडरमध्ये भरती
अशा स्थितीत 25 टक्के अग्निवीरांचा करार संपल्यानंतर कायमस्वरूपी केडरमध्ये समावेश होईल, मात्र चार वर्षानंतर उर्वरित 75 टक्के अग्निवीरांचे काय होणार, असा सवाल तरुण करत आहेत. सरकार त्यांना भत्ता देईल, पण नोकरी कुठून येणार?
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे