इचलकरंजीला पाणी दिल्यास रक्तपात होईल कागलचे आमदार हसन मुश्रीफ यांचं वादग्रस्त विधान

कोल्हापूर, २८ ऑगस्ट २०२३ : इचलकरंजी शहराला दूधगंगा नदीमधून पाणी देण्याचा प्रश्न चांगलाच पेटला आहे. या प्रकरणात आजपर्यंत केवळ आरोप प्रत्यारोप होत होते. पण आता रक्तपात आणि तलवारीची भाषा होऊ लागली आहे. इचलकरंजीला दूधगंगा नदीतून पाणी दिल्यास रक्तपात होईल अस वादग्रस्त वक्तव्य राज्याचे मंत्री आणि कागलचे आमदार हसन मुश्रीफ यांनी केलं आहे. तर इचलकरंजीला पाणी देण्यास विरोध करण्यासाठी नागरिकांनी तलवारी घेऊन बाहेर पडा असे आवाहन माजी आमदार के. पी. पाटील यांनी केले आहे.

दूधगंगा नदी मधून इचलकरंजी शहराला पाणी देणारी सुळकुड या योजनेला २०२० साली सुरुवात झाली, पण त्या विरोधात दूधगंगा नदी काठावरची गाव आक्रमक झाली आहेत. भाजपचे नेते आणि जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी या योजनेला प्रचंड विरोध केला. त्यावेळी इतर नेत्यांनी साथ दिली असती तर आता आक्षेपार्ह वक्तव्यं करण्याची वेळ आली नसती असं आता समरजितसिंह घाटगे हे म्हणाले आहेत. प्रश्न कोणताही असला तरी जबाबदार व्यक्तींनी रक्तपात किंवा तलवारीची भाषा करणे योग्य नाही. आपली ती संस्कृती नाही अशा शब्दात राज्याचे मंत्री दीपक केसरकर यांनी मुश्रीफांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली.

दूधगंगा नदीमधून आधीच कोल्हापूर शहराला त्याचबरोबर कर्नाटकसाठी पाणी आरक्षित ठेवलं जातं.आता पुन्हा इचलकरंजी शहराचा भार या नदीवर पडल्यास उन्हाळ्यामध्ये इथल्या नागरिकांना पाण्यासाठी टाहो फोडावा लागणार आहे. त्यामुळेच पाण्यासाठी हा संघर्ष सुरू झाला असल्याचं चित्र आहे. दूधगंगा नदीमधून इचलकरंजी शहराला पाणीपुरवठा करणारी योजना मंजूर झाली आहे. मात्र या योजनेला सुळकुड परिसरातील ग्रामस्थांनी विरोध दर्शवला आहे. या प्रकरणावरून कागल तालुक्यातील एकमेकांचे विरोधक हे एकत्र आल्याचं दिसून आलं आहे. या सर्व नेत्यांनी एकमुखाने इचलकरंजी शहराला पाणी देण्यास विरोध दर्शवला. शिवाय या योजनेच्या कामाला स्थगिती देण्याची सूचना देखील केली.

न्यूज अनकट प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा