उस्मानाबाद, ८ ऑगस्ट २०२०: उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादूर्भाव दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. अशा मध्ये जिल्ह्यातील लॉकडाउन हे ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत वाढवण्यात आले आहे. या सोबतच, कळंब तालुक्यातील वाढत्या संसर्गाकडे लक्ष देत कळंब शहरात ३ ऑगस्ट पासून ते ९ ऑगस्ट पर्यंत कर्फ्यू लागू केलेला आहे.
अशा परिस्थितीत आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी तालुक्यातील भाजपचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमार्फत कळंब शहरातील कंटेन्मेंट भागात तसेच डिकसळ, आढाळा, रत्नापूर, सात्रा, भाटसांगवी, देवळाली, धनेश्वरी बोरगाव, नागुलगाव, माळकरंजा, कोथळा, मस्सा (खं), ईटकूर, बोर्डा, आणि दहिफळ या गावांत सॅनिटाइजर, मास्क, तसेच रोगप्रतिकार शक्ती वाढवणारे आर्सेनिक अल्बम ३० गोळ्या उपलब्ध करून दिल्या.
मतदारसंघ हा कोणताही असला तरी कळंबचा जिव्हाळा कायमच वाटतो, असे म्हणत कळंबच्या बाबतीत आपण कुठलीही मदत करण्यास यापुढे देखील कमी पडणार नाही, याची दक्षता घ्यावी अशा सूचना राणाजगजितसिंह पाटील यांनी दिल्या. तसेच, कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर सर्वांनी सतर्क राहून स्वत:ची काळजी घ्या आणि प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करून सहकार्य करा, असे आवाहन देखील त्यांनी नागरिकांना केले आहे.
न्यूजअनकट प्रतिनिधी: प्रगती कराड.