केवळ कागदोपत्री ‘१००’ खाटा! पुणे महापालिकेच्या रुग्णालयाची मान्यता धोक्यात?

पुणे महापालिकेच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाची (कमला नेहरू रुग्णालय) मान्यता धोक्यात आली आहे. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (NMC) रुग्णालयात खाटांची संख्या कमी असल्याबद्दल नोटीस बजावल्याने प्रशासनाची धावपळ उडाली आहे. या नोटीसनंतर प्रशासनाने घाईघाईत १०० खाटा वाढवल्याचा दावा केला, पण प्रत्यक्षात या खाटांवर अद्यापही रुग्णसेवा सुरू झालेली नाही.

रुग्णालयात एकूण ४२० खाटा असून, त्यापैकी केवळ २८७ खाटांवरच उपचार सुरू आहेत. जनरल मेडिसीन, सर्जरी, त्वचारोग यांसह अनेक विभागांमध्ये खाटा रिक्त आहेत. यामागचे मुख्य कारण म्हणजे तज्ज्ञ डॉक्टर, परिचारिका आणि इतर आवश्यक मनुष्यबळाचा अभाव. त्यामुळे कागदोपत्री खाटा वाढवूनही त्याचा रुग्णांना फायदा होत नसल्याची टीका होत आहे. प्रशासनाने मनुष्यबळासाठी प्रस्ताव पाठवल्याचे सांगितले असले तरी, ही वाढ केवळ ‘दिखावा’ ठरत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी चंद्रशेखर रहांगडाले