मुंबई, ८ जानेवारी २०२१: काही महिन्यांपूर्वी कंगना रनौत व राज्य सरकार यांच्यात चांगलीच जुंपली होती. मात्र यादरम्यान कंगनाने मुंबईची तुलना पाकिस्तान शी केली होती. तसेच तिने धार्मिक भावना दुखावल्या जातील अशी विधाने देखील केली होती. याप्रकरणी कंगना रनौत विरोधात वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड विधान संहिता कलम २९५ अ आणि १५३ अ या कलमानुसार गुन्हा दाखल आहे. मेट्रोपोलिटीन मॅजिस्ट्रेट कोर्टाच्या आदेशानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कास्टिंग डायरेक्ट असलेल्या मूनवर अली सय्यद यांनी कोर्टात अर्ज करून कंगनाविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.
अली सय्यद यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत कोर्टाने याबाबत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. यासाठी वांद्रे पोलीस स्टेशन मधून कंगणाला दोन वेळा नोटीस देखील केली होती. मात्र, वैयक्तिक कारण सांगून तिने दोन्ही वेळा चौकशीसाठी जाण्यास नकार दिला होता. मात्र, आता वांद्रे पोलिसांनी कंगनाला तिसरी आणि शेवटची नोटीस पाठवली आहे.
याबाबत कंगनाची चौकशी करण्यासाठी कोर्टाने केवळ दोन तास दिले आहेत. यापूर्वी २३ नोव्हेंबर रोजी कंगनाला चौकशीसाठी वांद्रे पोलिसांकडून नोटीस देण्यात आली होती. मात्र या चौकशीसाठी न जाता तिने याउलट ही तक्रार रद्द करण्यासाठी कोर्टात धाव घेतली होती. कोर्टाने तिची ही मागणी रद्द करत तिला चौकशीत सहकार्य करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे कंगनाला आज चौकशीसाठी वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये हजर राहावे लागणार आहे.
अभिनेत्री कंगना रनौतला मुंबई पोलिसांनी १८ नोव्हेंबर रोजी तिसऱ्यांदा समन्स बजावला होता. कंगनासह तिची बहिण रंगोली रनौत-चंडेल हिलाही मुंबई पोलिसांनी समन्स बजावला होता. त्यामुळे या दोघींनाही वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये चौकशीसाठी हजर राहावे लागणार होते. २३ नोव्हेंबरला कंगनाला, तर २४ नोव्हेंबरला रंगोलीला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे