काही महिन्यांमध्ये ५ राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका आहे. या पार्श्वभूमीवर अन्य पक्षांप्रमाणे काँग्रेसकडूनही रणनीती आखण्यास सुरुवात करण्यात आली आहे. पक्षाची पूनर्बांधणी म्हणून काँग्रेस तरुणांना संधी देण्याच्या तयारीत आहे. तरुण आणि तडफदार नेत्यांचा शोध घेऊन काँग्रेस कात टाकण्याचा प्रयत्न करत आहे. याचाच एक भाग म्हणून काँग्रेसच्या रडारवर दोन युवा नेते आहेत. सीपीआयमध्ये असलेल्या कन्हैय्या कुमारने काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी तसेच प्रशांत किशोर यांची भेट घेतली असून, यामुळे तो काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. तर गुजरातमधील आमदार जिग्नेश मेवाणी यांना देखील काँग्रेसमध्ये सामील करुन घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
कन्हैय्या कुमारने काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी तसेच प्रशांत किशोर यांची भेट घेतली आहे. . ही बैठक शक्य तितकी गुप्त ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. तसेच काँग्रेसमधील बड्या नेत्यांनादेखील या भेटीची कल्पना नव्हती. खुद्द काँग्रेसचे गुजरातचे प्रदेशाध्यक्ष भक्त चरण दास यांनादेखील कन्हैया कुमार आणि राहुल गांधी यांच्यात झालेल्या भेटीची खबर नव्हती. पक्षातील जुन्या-जाणत्या नेत्यांचा प्रभाव कमी झाला आहे. त्यामुळे आता युवकांना प्राधान्य आणि संधी दिली पाहिजे, असा सल्ला प्रशांत किशोर यांनी राहुल गांधी यांना दिल्याचे सांगितले जात आहे.
तर दुसरीकडे गुजरातमध्ये आमदार जिग्नेश मेवानी यांच्या रुपात काँग्रेसला तरुण आणि तडफदार चेहरा मिळू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जातोय. काही दिवसांपूर्वी मेवाणी यांनीही राहुल गांधी यांची भेट घेतली आहे. या भेटीत काँग्रेस प्रेवशाबाबत चर्चा करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे