कारगिल विजय दिवस….

4

कारगिल युद्ध हे भारत व पाकिस्तान यांच्या दरम्यान सन १९९९च्या उन्हाळ्यात लढले गेलेले मर्यादित युद्ध होते. या युद्धाची व्याप्ती भारताच्या कारगिल व आजूबाजूच्या परिसरापुरतीच मर्यादित राहिली, त्यामुळे याला मर्यादित युद्ध म्हणतात.तसेच या पूर्वीच्या भारत-पाक युद्धांप्रमाणेच या ही युद्धात, युद्ध सुरू झाल्याची व संपल्याची कोणतीही घोषणा करण्यात आलेली नव्हती. उलट पाकिस्तानतर्फे युद्धा दरम्यान त्यांचा देश अलिप्त आहे असा कांगावा करण्यात आला होता.पुढे अनेक वर्षांनंतर हळूहळू पाकिस्तान सरकारने व अनेक लष्करी अधिकाऱ्यांनी हे युद्धच होते असे जाहीर केले.

पाकिस्तानचे ऑपरेशन “बद्र” घुसखोरी……

इ.स. १९९८-९९ च्या हिवाळ्यात पाकिस्तानी लष्करातून अनेक तुकड्यांना मुजाहिदीनच्या वेषात भारतात नियंत्रण रेषेपलीकडे पाठवण्यात आले. या कारवाईला ऑपरेशन बद्र असे नाव देण्यात आले व कुणाच्याही लक्षात न येता त्यांनी रिकाम्या भारतीय चौक्यांचा ताबा घेतला. हिवाळ्यात प्रचंड थंडीमुळे सैन्य माघारी घेतले जाते.नियंत्रण रेषेच्या जास्तीत जास्त आत घुसखोरी करून राष्ट्रीय महामार्ग १ च्या जवळ यायचे.महामार्गावर कायमस्वरूपी ताबा मिळवता येईल आणि नंतर राजकीय वजन वापरून काश्मीरच्या प्रश्नाचे आंतरराष्ट्रीयीकरण करणे पाकिस्तानला सोपे पडेल असा हा या कारवाईचा मुख्य उद्देश होता. भारताला नवीन नियंत्रण रेषा मान्य करायला भाग पाडले की. लडाख व सियाचीनला भारतापासून तोडणे सोपे जाईल असा पाकिस्तानी युद्धनीतिज्ञांचा कयास होता. तसेच घुसखोरीदरम्यान कारगील/काश्मीर परिसरात अंतर्गंत बंडखोरी भडकावून भारताला अजून बुचकळ्यात पाडण्याचा पाकिस्तानी व्यूह होता.भारतीयांनी सियाचीन हिमनदीवर नियंत्रण मिळवण्यात जी क्‍ऌप्ती वापरली तसाच काहीसा प्रकार पाकिस्तानने केला असा काही लेखकांचा सूर होता.कडक हिवाळ्यातील महिन्यांमध्ये मनुष्यहानी कमी व्हावी म्हणून, अतिउंचावरील चौक्या रिकाम्या करायचा प्रघात भारत व पाकिस्तान हे दोघेही पाळत होते. हवामान पुन्हा ठीकठाक झाल्यानंतर दोन्ही बाजूंचे सैन्य आपापल्या चौक्यांमध्ये परतून संरक्षणाची जबाबदारी घेत असे.फेब्रुवारी, इ.स. १९९९ मध्ये पाकिस्तानी लष्कराने कडक हिवाळ्यातच भारतीय चौक्यांचा ताबा घेणे आरंभले.पाकिस्तानने ही कारवाई अतिशय सूत्रबद्धरीत्या व थांगपत्ता लागू न देता पार पाडली.

 

भारतीय गुप्तहेर खाते घुसखोरी पासून अभिज्ञ…..

सुरुवातीला, अनेक कारणांमुळे कारगिलची घुसखोरीचा पत्ता लागण्यास उशीर झाला. मुख्यत्वे पाकिस्तानने अनेक भागात तोफांचा मारा केल्यामुळे शोधपथक पाठवण्यास दिरंगाई झाली.जेव्हा एका स्थानिक मेंढपाळाने हि माहिती भारतीय सैन्याला दिली आणि भारताकडून एक तुकडी बघण्यासाठी पाठविले असता तुकडीवर हल्ला झाला आणि घुसखोरी झाल्याचे निष्पन्न झाले.गुप्तहेर खात्याला या घटनेची माहिती अजिबात मिळाली नाही त्यामुळे भारतीय गुप्तहेर खात्याच्या कार्यक्षमतेवर सर्वत्र भारतातून व जगातूनही चांगलीच टीका झाली. स्पेशल सर्विसेसच्या सर्वोत्कृष्ट तुकड्या, तसेच नॉर्दर्न लाइट इन्फट्रीच्या ४ ते ७ बटालियन तुकड्या या कामात गुंतल्या होत्या.


भारताकडून सरकारचे “ऑपरेशन विजय” तर वायु सेनेकडून ऑपरेशन “सफेद सागर”


भारतीय सरकारने ‘ऑपरेशन विजय’ या नावाखाली कारगिलच्या युद्धासाठी कार्यवाही चालू केली. त्यासाठी संख्येने मुळात सुमारे २,००,००० इतक्या फौजेचा आधार घेण्यात आला. परंतु भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता मोठ्या प्रमाणावर युद्ध करणे शक्य नव्हते. त्यामुळे रेजिमेंटल व बटालियन पुरतीच कारवाई शक्य होती. अर्थातच फौजेची गणसंख्या २०,००० पर्यंत मर्यादित ठेवण्यात आली.अर्धसैनिक व वायुदल मिळून भारताने एकूण ३०,००० पर्यंत सैनिक कारगिलच्या युद्धात वापरले. घुसखोरांची संख्या पाकिस्तानी सूत्रांप्रमाणे साधारणपणे ५,००० होती.यांत पाकव्याप्त काश्मीरमधील तोफखान्यामधील सैनिकही समाविष्ट होते.

भारतीय सैनिकांची चतुराई

या युद्धात भारतीय सैन्याने नवनवीन क्‍ऌप्त्यांचा चांगलाच वापर केला. काही लढायांमध्ये भारतीय सैनिकांनी रात्रीच्या अंधारात हजारो फूट सरळसोट कड्यांवर गिर्यारोहण करून शत्रूवर अनपेक्षित ठिकाणांवरुन हल्ले चढवले व चौक्या ताब्यात घेतल्या. काही ठिकाणी भारतीय सैन्यातील काही मुसलमान तुकड्यांनी आक्रमण करताना ‘अल्ला हू अकबर ‘ असा नारा देत हल्ला केला त्यामुळे शत्रूपक्ष आपलेच सैनिक आहेत या भ्रमात राहिले व चौक्या गमवाव्या लागल्या. बहुतांशी चौक्या या खूप उंचीवर होत्या व काश्मीरमधील हा भाग दगडी व रेताड आहे त्यामुळे लपायची फारशी जागा उपलब्ध नव्हती. त्यासाठी भारतीय सैन्याने मनुष्यहानी कमी व्हावी म्हणून बहुतेक हालचाल रात्रीच्या वेळेसच करण्याचे धोरण आखले होते. परंतु रात्रीच्या हालचाली ह्या वेळखाऊ होत्या. तसेच या उंचीवरील अतिशय कमी तापमान व जबरदस्त उतारावरील लढाया ह्या सर्वच गोष्टी भारताच्या विरोधात होत्या. या भागात सर्व चौक्यांना वेढा देऊन घुसखोरांचा रसद पुरवठा तोडून कमी जोखमीचे चे युद्ध करणे भारताला शक्य होते तसेच पूर्णपणे हवाई हल्ले चढवून घुसखोरांच्या ताब्यातील चौक्या मिळवणेही शक्य होते. परंतु या साठी भारताला नियंत्रण रेषेपलीकडचा भाग मिळवणे आवश्यक होते. जर तसे केल्यास पूर्ण युद्ध होण्याची शक्यता होती व भारत सरकार यासाठी तयार नव्हते. जर असे झाल्यास या युद्धात मिळालेली आंतरराष्ट्रीय सहानुभूती भारत गमावेल अशी त्यांना भीती होती.

तोलोलिंग आणि टायगिर हिल मिळवण्यात यश…..

भारताने जेव्हा महामार्गालगतच्या महत्त्वाच्या चौक्यांवर ताबा मिळवला तेव्हा भारतीय सैन्याने घुसखोरांना नियंत्रण रेषेपलीकडे पिटाळायचे धोरण आखले. तोलोलिंगची लढाई व टायगर हिलची लढाई ही या युद्धातील सर्वात महत्त्वाची घटना मानली जाते. अनेक शूर भारतीय अधिकारी व सैनिक या लढायांमध्ये मरण पावले. तोलोलिंगच्या लढाईनंतर सामरिक तसेच राजनैतिकही पारडे पूर्णपणे भारताच्या बाजूने झुकले. टायगर हिलवर उशीरा नियंत्रण मिळवले गेले तरी ती सर्वात महत्त्वाची लढाई होती असे मानतात. टायगर हिलच्या लढाईत दोन्ही बाजूने जबरदस्त प्रयत्‍न झाले. पाकिस्ताननेही खंदक वगैरे खोदून भारतीय सैनिकांना चांगलेच झुंजावयाला लावले. सरतेशेवटी ४ जुलै रोजी टायगर हिल भारताच्या ताब्यात आली. या लढाईत भारताचे ५ सैनिक व पाकिस्तानचे १० सैनिक मृत्यूमुखी पडल्याचे कळते.


“कारगिल विजय” मिळाले पण ५२७ सैनिक शहीद झाले,तर पाकिस्तानी शहीदांना स्वत:च्याच देशात जागा मिळाली नाही….

भारताने इ.स. १९९९ सालच्या जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत अनेक महत्त्वाच्या लढाया केल्या व अनेक जागा ताब्यात मिळवल्या. युद्धात ५२७ भारतीय जवान शहीद झाले तर २७०० पाकिस्तानी सैनिक मारले गेले .मृतदेह जेव्हा स्विकारण्याची वेळ पाकिस्तान वर आली तेव्हा अनेक सैनिकांचे मृतदेह त्यांनी स्विकारलचे नाही.आणि त्यांचे अंतसंस्कार हे भारतीय लष्कराने केले.

हे युद्ध आधुनिक इतिहासातील अतिउंचीवरच्या युद्धाचे अत्युत्‍कृष्ट उदाहरण आहे. यात युद्धाला लागणारी सामग्री व मनुष्यबळ ने-आण करण्याचा चांगलाच अनुभव भारतीय सैन्याला मिळाला. हे युद्ध दोन्ही देश अण्वस्त्रसज्ज झाल्यानंतरचे पहिलेच युद्ध होते त्यामुळे सर्व जगाचे लक्ष या युद्धाकडे लागले होते. परंतु भारताने हे युद्ध कारगीलपुरतेच मर्यादित ठेवले. त्यामुळे दाखवलेल्या संयमाबद्दल भारताचे जगभर कौतुक झाले. म्हणूनच, भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर पाठिंबा मिळाला व याउलट, सैन्य मागे घ्यावे यासाठी पाकिस्तानवर अमेरिकेसह अनेक देशांनी दबाव आणला. या युद्धानंतर भारताने आपल्या संरक्षण खर्चात अनेक पटीने वाढ केली. तर पाकिस्तानात राजकीय अस्थिरता माजली. परिणामी, काही महिन्यांतच म्हणजे ऑक्टोबर, इ.स. १९९९ मध्ये पाकिस्तानात जनरल परवेझ मुशर्रफ यांनी नवाझ शरीफ यांचे सरकार उलथून लष्करशाही लागू केली. कारगिल युद्ध भारताने जिंकला .

आज संपूर्ण देशभरात २१ वा “कारगिल विजय” दिवस साजरा होत आहे.त्या निमित्ताने न्यूज अनकटच्या माध्यमातून सर्व देशवासियांना “कारगिल विजय” दिनाच्या शुभेच्छा आणि शहीदांना विनम्र आभिवादन…..

न्यूज अनकट प्रतिनिधी

3 प्रतिक्रिया

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा